मुंबई
ladki bahin yojana राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता सप्टेंबरच्या सन्मान निधीची प्रतीक्षा सुरू आहे. नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू असून, २५ ऑक्टोबरनंतर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हा निधी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
रक्षाबंधन तसेच गणेशोत्सवाच्या काळात सरकारने लाडकी बहीण योजनेचा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यावर वर्ग केला होता. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया सप्टेंबरच्या अखेरीस सुरू झाली होती. त्यानंतर २ ऑक्टोबरपर्यंत बहुतांश लाभार्थी महिलांच्या खात्यात १,५०० रुपयांची रक्कम जमा झाली होती. आता दसरा आणि त्यानंतर येणाऱ्या दिवाळीच्या सणाचा विचार करता, सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या उत्तरार्धात देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे.
सप्टेंबरचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना प्रत्येकी १,५०० रुपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थी महिलेच्या आधारशी संलग्न बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थींना या निधीचा थेट लाभ मिळणार आहे.
दरम्यान, २५ ऑक्टोबरनंतरladki bahin yojana हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी त्याची निश्चित तारीख सरकारकडून अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सप्टेंबरचा सन्मान निधी नेमका कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार, याकडे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर हप्त्याच्या वितरणाबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.