मुंबई
legislative council election 2026 राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुती तसेच विरोधी महाविकास आघाडीने बहुतांश मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, उमेदवारांची घोषणा होताच दोन्ही आघाड्यांमध्ये नाराजी आणि बंडखोरीची चिन्हे दिसू लागली आहेत. उमेदवारी न मिळाल्याने काही इच्छुक अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने अधिकृत उमेदवारांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या मतदारसंघात गावडे आणि आसगावकर यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे नेते मंगेश चिवटे हेही निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान निर्माण होऊ शकते.
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने स्मिता जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून हर्षदा देशमुख यांचे नाव पुढे आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतील इच्छुक भैय्या माने हेही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघातही आघाडीतील अंतर्गत नाराजीचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसकडून अभिजीत वंजारी निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघात भाजपचे माजी आमदार अनिल सोले हे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागपूरमध्ये भाजपसमोरही पक्षांतर्गत आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसकडून आदिती पोहरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने हे या जागेसाठी इच्छुक असल्याने येथेही बंडखोरीची शक्यता व्यक्त केली जात आहे.छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून दिलीप घुगे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, ठाकरे गटाने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. दुसरीकडे, भाजपचे संजय केणेकर हेही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.उमेदवारांच्या अधिकृत घोषणेनंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. काही नाराज नेते अपक्ष म्हणून अर्ज दाखल करतात की पक्षश्रेष्ठी त्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात, याकडे आता लक्ष लागले आहे. बंडखोर उमेदवार रिंगणात उतरल्यास त्याचा थेट परिणाम अधिकृत उमेदवारांच्या मतविभाजनावर होऊ शकतो.