इन्फ्लुएन्सरची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या

कुख्यात गँगस्टरने घेतली जबाबदारी

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
अमृतसर
mad sandhu murder अमृतसरमध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘मॅड संधू’ या नावाने लोकप्रिय असलेल्या इन्फ्लुएन्सरवर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संधूचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, कुख्यात गँगस्टर गोल्डी ढिल्लो आणि जग्गा तरनतारन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.
 

mad sandhu murder amritsar social media influencer shot dead, goldy dhillon claims responsibility 
पोलिस अधिकारी एडीसीपी वेनिला यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता पंजाबमधील अमृतसर येथील लोहारका रोडवर ही घटना घडली. मॅड संधू या ठिकाणी असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या संधूला रक्ताच्या थारोळ्यातून तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके कामाला लागली असून, तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
गोल्डी ढिल्लो कोण?
पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा गोल्डी ढिल्लो सध्या ब्रिटनमध्ये लपून बसल्याचे सांगितले जात आहे. त्याचे पूर्ण नाव गुरप्रीत सिंग उर्फ गोल्डी ढिल्लो असून, तो कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारचा जवळचा साथीदार असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.
गोल्डी ढिल्लोविरुद्ध पंजाब, चंदीगड आणि कॅनडामधील व्यावसायिकांना लक्ष्य करून खंडणीचे रॅकेट चालवणे, हत्या, तस्करी आणि गोळीबारासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गोल्डी ढिल्लो आणि जग्गा तरनतारन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे संधूच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. या पोस्टची आणि त्यातील दाव्यांचीही पोलीस पडताळणी करत आहेत.
 
 
 हत्येनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप
मॅड संधूच्या हत्येनंतर पंजाबमधील राजकीय वातावरणही तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. राजकुमार वेरका यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आम आदमी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला. अमृतसरमध्ये भरदिवसा गोळीबाराच्या घटना घडत असून सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. संपूर्ण पंजाबमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला.
 
 इन्स्टाग्रामवर अडीच लाखांच्या जवळपास फॉलोअर्स
मॅड संधू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होता. इन्स्टाग्रामवर त्याचे सुमारे २ लाख २६ हजार फॉलोअर्स होते. इन्स्टाग्राम रील्स आणि व्हायरल व्हिडिओंमुळे त्याला मोठी ओळख मिळाली होती. लक्झरी फॅशन आणि सौंदर्यविषयक टिप्स, जीवनशैलीशी संबंधित माहिती, सामाजिक चालीरीती, LGBTQ स्वीकृती तसेच पॉप कल्चर यांसारख्या विषयांवर तो आपली स्पष्ट मते मांडत असे.
सोशल मीडियावरील लोकप्रियतेसोबतच संधूने मनोरंजन क्षेत्रातही काम केले होते. ‘ओये भोले ओये’ या मालिकेसह त्याने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्याच्या हत्येमुळे सोशल मीडिया आणि पंजाबी मनोरंजन क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.