केली मोठी घोषणा मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर निशाणा

नारायणगडच्या दसरा मेळाव्यासाठी मराठा समाजाला आवाहन

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
मुंबई
manoj jarange patil मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करत आगामी दसरा मेळाव्याबाबतही भूमिका स्पष्ट केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नारायणगड येथे दसरा मेळावा होणार असून, या मेळाव्यासाठी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ते जालन्यात बोलत होते.
 

manoj jarange patil calls marathas for narayangad dussehra rally, targets government 
गणेशोत्सवादरम्यान मुंबईत आंदोलन करण्याची हाक जरांगे पाटील यांनी दिली होती. मात्र, नंतर त्यांनी आंदोलनातून माघार घेतली होती. आता नारायणगडच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जरांगे पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले. भाजप सरकारने ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकार आणि ज्ञानेश कुमार यांच्यात काही मिलीभगत आहे का, असा संशय निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. तसेच, निवडणूक आयोगाची दडपशाही आणि दहशत आता जनतेला सहन होत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी गावागावांत चारा छावण्या सुरू कराव्यात, तसेच सरसकट कर्जमाफी का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जनता सत्तेवर बसवू शकते, तर सत्तेतून खालीही खेचू शकते, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
मराठा समाज आरक्षणाची मागणी करत असताना त्यांच्यावर दडपशाही केली जात असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. मराठा आंदोलकांना त्रास दिला जात असून आपल्यावरही मोठ्या प्रमाणात दबाव आणला जात असल्याचे ते म्हणाले. सरकारकडून आपल्याला झुकवण्याचा प्रयत्न झाला, तर प्रत्येक वेळी मराठा समाजाने शंभरपट ताकदीने एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारच्या कारभारावर टीका करताना जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत निशाणा साधला. देशात घोषित हुकूमशाही आणि जुलमी राजवट सुरू असल्याचा आरोप करत हे सरकार अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, आपण सरकारचे मित्र होण्यासाठी तयार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नारायणगड येथे होणारा दसरा मेळावा नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.