बोस्टनकडे निघालेले मेडिकल विमान बेपत्ता!

मलबा सापडला, 6 जणांचा शोध सुरू

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |

a235456
 
 
नॅनटकेट,
Medical plane bound for Boston goes missing अमेरिकेतील नॅनटकेटच्या समुद्रकिनाऱ्याजवळ वैद्यकीय रुग्णवाहतूक करणारे विमान बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मलबा आढळून आला आहे. बरम्युडाहून बोस्टनकडे जाणाऱ्या या विमानात सहा जण प्रवास करत होते. विमानाचा संपर्क तुटल्यानंतर अमेरिकन कोस्ट गार्डकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली. मात्र, विमानातील सहा जण अद्याप सापडलेले नाहीत.अमेरिकन कोस्ट गार्डच्या माहितीनुसार, शनिवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे 2 वाजता फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने संबंधित अधिकाऱ्यांना गल्फस्ट्रीम G100 विमानाशी संपर्क तुटल्याची माहिती दिली. या विमानाचा टेल नंबर C-GRJP होता. कॅनडातील एरो-मेडिकल वाहतूक सेवा पुरवणाऱ्या ‘लॅटिट्यूड एअर अॅम्ब्युलन्स’ या कंपनीकडून या विमानाचे संचालन केले जात होते. विमानाचा मलबा नॅनटकेटच्या किनाऱ्याजवळ शोध पथकांना आढळला असून तो बेपत्ता विमानाचाच असल्याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे. विमानातील सहा जणांमध्ये कॅनडाचे चार आणि बरम्युडाचे दोन नागरिक होते. त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. कोस्ट गार्डचे ‘विल्यम स्पार्लिंग’ हे जहाजही रात्रीभर शोधमोहीम सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.