श्रीनगर,
mukesh-shines-in-the-irani-cup देशांतर्गत क्रिकेटच्या नव्या हंगामाची सुरुवात इराणी कपच्या सामन्याने झाली. शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर रेस्ट ऑफ इंडिया आणि २०२५-२६ रणजी विजेता जम्मू आणि काश्मीर यांच्यात झालेल्या सामन्यात रेस्ट ऑफ इंडियाने १६७ धावांनी विजय मिळवला. चौथ्या डावात जम्मू आणि काश्मीरसमोर २७९ धावांचे लक्ष्य होते. मात्र, रेस्ट ऑफ इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर त्यांचा डाव २८.४ षटकांत १११ धावांवर आटोपला. या विजयात मुकेश कुमारची गोलंदाजी निर्णायक ठरली.
रेस्ट ऑफ इंडियाचे नेतृत्व ऋषभ पंतकडे होते. सामन्याच्या पहिल्या डावात दोन बळी घेणाऱ्या मुकेश कुमारने दुसऱ्या डावात आपल्या गोलंदाजीचा प्रभाव अधिक ठळकपणे दाखवला. त्याने १०.४ षटकांत अवघ्या ३३ धावा देत सहा फलंदाजांना बाद केले. जम्मू आणि काश्मीरचा कर्णधार पारस डोग्रा तसेच अब्दुल समद यांच्याही विकेट त्याच्या खात्यात जमा झाल्या. सामन्यात मुकेशने एकूण आठ बळी मिळवत रेस्ट ऑफ इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघात पुनरागमनाच्या चर्चेलाही वेग आला आहे.
इराणी कपच्या या सामन्यात रेस्ट ऑफ इंडियाच्या अन्य वेगवान गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी केली. मुकेश चौधरीने सामन्यात सहा बळी घेतले, तर आकाशदीपने जम्मू आणि काश्मीरच्या दोन्ही डावांत प्रत्येकी तीन बळी मिळवत एकूण सहा विकेट घेतल्या. सलग दोन वेळा इराणी कपच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करल्यानंतर रेस्ट ऑफ इंडियाने यंदा विजेतेपद मिळवले. या विजयासह संघाने इराणी कपवर ३३व्यांदा नाव कोरले.