नागपूर,
nagpur-cyber-fraudसायबर गुन्हेगार अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून फसवणुकीचे नवे मार्ग शोधत आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षा हा केवळ तांत्रिक विषय न राहता प्रत्येक व्यवसायासाठी प्राधान्याचा विषय झाला आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाशी संबंधित सायबर सुरक्षा तज्ज्ञ ऋषि मेहता यांनी सांगितले. विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे ‘एंटरप्राइज सायबर सिक्युरिटी अँड सायबर क्राईम’ या विषयावर आयोजित सत्रात ते बोलत होते.
सायबर गुन्हेगार सुरुवातीला सार्वजनानिकरीत्या उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, फोन कॉल, एसएमएस आणि व्हॉट्सॲप हे त्यांच्यासाठी सहज उपलब्ध मार्ग आहेत. ई-मेल, इंटरनेटला जोडलेली उपकरणे आणि असुरक्षित ॲप्लिकेशन्सचाही गैरवापर केला जातो. त्यामुळे डिजिटल व्यवहारांबाबत जागरूकता आणि शिस्तबद्ध वर्तन ही सायबर सुरक्षेची पहिली पायरी असल्याचे मेहता यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी किंवा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची बनावट ओळख निर्माण करून कर्मचाऱ्यांकडून तातडीने आर्थिक व्यवहार करून घेतले जाऊ शकतात. अशा वेळी ‘मेकर-चेकर’ प्रणाली, स्वतंत्र माध्यमातून व्यवहाराची पडताळणी आणि संशयास्पद व्यवहारांसाठी ‘कूलिंग-ऑफ’ कालावधी ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
बनावट कर नोटिसा, जीएसटी संदेश, मालवेअर, पासवर्ड चोरी, पेमेंट सूचनांमध्ये फेरफार आणि म्यूल खात्यांद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. जीएसटी किंवा करसंदेशांची पडताळणी केवळ अधिकृत संकेतस्थळांवरूनच करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संवेदनशील माहिती एआय प्लॅटफॉर्मवर टाकताना काळजी घेण्याचे आवाहन करून त्यांनी वार्षिक सायबर सुरक्षा ऑडिट, सायबर विमा, ऑफलाइन बॅकअप आणि नियमित सुरक्षा तपासणीची गरज व्यक्त केली.“सायबर सुरक्षा हा हल्ल्यानंतरचा खर्च म्हणून पाहू नये. प्रतिबंध हाच सर्वात किफायतशीर उपाय आहे. मोठ्या सायबर हल्ल्यानंतर पुनर्प्राप्तीच्या खर्चापेक्षा पूर्वतयारीचा खर्च नेहमीच कमी असतो,” असे मेहता म्हणाले. सायबर गुन्ह्यांचे वाढते संघटीकरण लक्षात घेता घटना घडताच तातडीने तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सायबर क्राईमच्या पोलीस उपायुक्त महक स्वामी यांनी व्हीएमएच्या उपक्रमाचे कौतुक करत जागरूकता आणि सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी कामठी आर्मी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण सावंदकर, ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मिथिलेश जिंदाल यांनी सूत्रसंचालन केले, तर विनायक गावंकर यांनी समन्वय साधला