नागपूर,
nagpur-quantum-capitalज्या पद्धतीने बंगळुरूने देशाची ‘आयटी कॅपिटल’ म्हणून ओळख निर्माण केली, त्याच धर्तीवर नागपूरमध्ये भारताची ‘क्वांटम कॅपिटल’ बनण्याची अफाट क्षमता आहे. क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, स्टार्टअप्स, कौशल्यविकास आणि उद्योगांना एकत्र आणल्यास नागपूर या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करू शकते, असे प्रतिपादन क्वांटम तंत्रज्ञान तज्ज्ञ रवींद्र बारलिंगे यांनी केले. टेकनेक्स्ट असोसिएशन व इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’ या विषयावर शनिवारी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन (व्हीएमए), असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व नागपूर फर्स्ट यांचे सहकार्य लाभले. यावेळी बारलिंगे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाला एआयडीचे सीईओ डॉ. कपिल चांद्रायण, टेकनेक्स्ट असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र गिरिधर, व्हीएमएच्या अध्यक्षा मिली जुनेजा, एसटीपीआयचे ऑफिस इन-चार्ज संजय दरणे आणि नागपूर फर्स्टचे तनवीर मिर्झा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मॉडरेटर डॉ. विवेक नानोटी तर प्रोजेक्ट डायरेक्टर पंकज रडके होते.
बारलिंगे म्हणाले, पारंपरिक संगणकांच्या तुलनेत क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये अत्यंत वेगाने आणि गुंतागुंतीच्या गणना करण्याची क्षमता आहे. त्यामुळे जागतिक सुरक्षा, बँकिंग, संरक्षण, आरोग्य आणि औषध संशोधनासह अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडू शकतात. मात्र, या तंत्रज्ञानामुळे सध्याच्या डेटा सुरक्षा आणि एन्क्रिप्शन पद्धतींसमोरही नवी आव्हाने निर्माण होणार आहेत.
सायबर सुरक्षा, बँकिंग आणि संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी भारताने ‘क्वांटम-सेफ’ तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी ठोस रोडमॅप तयार करणे आवश्यक आहे. भविष्यात क्वांटम कॉम्प्युटर्सच्या क्षमतेमुळे सध्या साठवून ठेवलेला एन्क्रिप्टेड डेटा धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे ‘क्वांटम-सेफ क्रिप्टोग्राफी’कडे आतापासूनच वळणे गरजेचे आहे, असे बारलिंगे यांनी सांगितले.
नागपूरमधील वीज, खाणकाम, आरोग्य आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांना ‘क्वांटम-रेडी’ करण्याची गरज आहे. संशोधन संस्था, उद्योग, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास नागपूरला क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. कपिल चांद्रायण यांनी रस्ते विकासातील पीपीपी मॉडेलचे उदाहरण देत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी त्याला अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापनाची जोड आवश्यक असल्याचे सांगितले. आगामी ‘क्वांटम युगा’तील तंत्रज्ञान व्यावहारिक आणि सर्वसामान्य वापरासाठी उपयुक्त ठरण्यासाठी अशा मॉडेल्सची निर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विशाल लिचडे, प्रवीण पंचभाई, अभिनय ढोबळे, हेमंत झुंझूरकर, सचिन येते, जयंत जोशी, राजेंद्र जिंदाल, नरेश वासू, मंजुषा जोशी, प्रसाद बंडावार आदींचे सहकार्य लाभले. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांचे सत्र झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी रघुते यांनी केले, तर सारंग जावखेडकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला उद्योजक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.