नाशिक
nida khan नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचाराच्या कथित प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी निदा एजाज खान हिला नाशिक सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. निदा सध्या आठ महिन्यांची गर्भवती आहे. याच प्रकरणातील आणखी एक संशयित तौसिफ बिलाल आत्तार यालाही न्यायालयाने जामीन दिला आहे. मात्र, मुख्य संशयित आरोपी दानिश शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निदा खान हिच्यावर कारवाई करण्यात आली होती. गंभीर आरोपांमुळे तिला गर्भावस्थेतही कारागृहात राहावे लागले. बहुराष्ट्रीय कंपनीतील तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे निदासह अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात मोठी चर्चा निर्माण झाली होती.
दरम्यान, न्यायालयीन कारवाईला सामोरे जात असतानाच निदा खानच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठे संकट निर्माण झाले आहे. सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. मात्र, प्रकरणातील आरोप, पोलिस तपास आणि त्यानंतर सुरू झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर तिच्या वैवाहिक आयुष्यातील मतभेद टोकाला गेल्याचे समोर आले आहे.निदाच्या पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाची दखल घेत न्यायालयाने निदाला समन्स बजावले असून, १६ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एका बाजूला गंभीर फौजदारी प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना दुसऱ्या बाजूला वैवाहिक वादालाही सामोरे जाण्याची वेळ निदावर आली आहे.२६ मार्चपासून या प्रकरणात नाव आल्यानंतर पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रकरणामुळे झालेली बदनामी आणि निर्माण झालेल्या सामाजिक दबावाच्या पार्श्वभूमीवर पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे सांगितले जात आहे. आता १६ ऑक्टोबरच्या सुनावणीत न्यायालयासमोर निदाची बाजू काय राहते आणि घटस्फोटाच्या अर्जावर पुढे काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.