चित्रसफर
रमेश विनायक पोफळी
dr shreeram lagoo ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली । माझ्या काळजाची तार आज छेडीली ।।’ (पिंजरा १९७२)
तत्त्वनिष्ठ शिक्षकाचा आदर्शव्रत, नैतिक मानसिक प्रवास एका कलावंतिणीच्या सोबतीमुळे संपतो. नैतिकतेचे पतन होऊन अपमानास्पद जीवन हाती येते. हातात तुणतुण घेऊन तमाशाच्या खेळात हा सोंगाड्या आपली कर्मकहाणी कथन करतो... ‘सत्त्वशील चारित्र्याची घालमेल झाली । नार सूड भावनेनं उभी पेटली’ आदर्शाच्या तोऱ्यामुळे कलावंतीण दुखावते व म्हणते, ‘मास्तर, नाय तुमच्या हातात तुणतुण दिलं तर चंद्राबाई नाव सांगणार नाही...’ या प्रसंगाची आठवण गाण्यात प्रकट केली. ‘त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली...’ त्याच्या पतंगरूपी आदर्श जीवनाची दोर तुटली असते. श्रीराम लागू या नटश्रेष्ठाने हातात तुणतुणं घेऊन केविलवाण्या अवस्थेतही करारी अभिनयाने आदर्शाचा ऱ्हास पटावर मांडून शांताराम यांच्यासारख्या दिग्गजाच्या पसंतीस उतरले व स्वतःला अभिनय सम्राट सिद्ध केले.
‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...’ (सामना १९७४)
सामाजिक शोषण, राजकीय व्यवस्थापन व साधारण माणसाचा निरुपाय यावर भाष्य करून धडाडीने लढणारे डॉ. लागू व या सर्व मर्यादा ओलांडणारे, ग्रामीण भागातील राजकारण व दबावाखाली गुन्हे लपविण्याची प्रवृत्ती असलेले इरसाल सरपंच निळू फुले या दोन अभिनय सम्राटांच्या अभिनयाचा खऱ्या अर्थी सामना. डोईवर मळकी टोपी, खांद्यावर लटकवलेली झोळी, दाढीचे वाढलेले खुंट या अवतारात पूर्णपणे हतबल होऊन, मनात संघर्षाचे ओझे घेऊन वाट तुडवीत डॉ. लागू जात असता पार्श्वसंगीतात विशिष्ट पात्रावर लिप सिंक न करता हे गाणे चित्रित आहे. ‘दीप सारे जाती येथे विरून विझून । वृक्ष जाती अंधारात गोठून गोठून’ राजकीय परिस्थितीतील वास्तव्यावर प्रकाश टाकणाऱ्या अन्वयार्थक पार्श्वगीतावर डॉ. लागू यांचा साध्या चालण्याचा प्रभाव परिस्थितीवर प्रकाश टाकतो... ‘देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी... कुणाच्या...’ अशा तरणोपाय नसलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी जो पुढे येईल त्याचा हमखास अंत होईल. या मार्मिक इशाऱ्यानंतर हे गीत संपते. ७० च्या दशकातील मराठीतील हा आयकॉनिक सिनेमा होता. यातील दोन दिग्गजांच्या संवादाची जुगलबंदी पण जमेची बाजू होती.
डॉ. लागू : मारोती कांबळेचं काय झालं?
निळू फुले : मास्तर, गप गुमान रहा की... कशाला उगाच चौकशा करता?
डॉ. लागू : इश्क करण्यासाठी जागे कसे रहावे व मारुती कांबळे कोण आहे.?
सरपंचांच्या चावडीवर सर्वांसमक्ष विचारलेल्या प्रश्नावर सरपंचांची भंबेरी उडते.
‘या टोपी खाली दडलंय काय । या मुकुटाखाली दडलंय काय?’ सामना चित्रपटातील हेही एक श्रीराम लागू यांच्या अभिनयात रंगलेले गाणे, आठवणीतील ठेवा आहे.
१९७७ च्या ‘पारध’ या रहस्यमयी चित्रपटात सेठ दीनानाथ हे भारदस्त पात्र डॉक्टरांनी अक्षरशः अभिनयाची कस लावून अभिनित केले. सुरुवातीस गर्भश्रीमंत व्यावसायिकेच्या भूमिकेत करारी आवाज व संवादाची अचूक टायमिंग साधत केलेली फेक. नंतर रहस्यमयी घटनांमुळे संभ्रमित झालेले व्यक्तिमत्त्व. दोन्ही छटा ताकदीने सादर केल्या. भारदस्त संवादफेकी व देहबोलीतून अंधश्रद्धा दूर करून मानवी कारस्थान पुराव्याच्या आधारे सिद्ध करून बुद्धिप्रामान्यवादाचे महत्त्व उजागर करतात. डॉ. लागू अभिनय क्षेत्रातील अलग रसायन आहे याची साक्ष पटते.
‘गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा...’ (देवकी नंदन गोपाळा, १९७७)
संत गाडगेबाबांचा अंधश्रद्धेवर प्रहार, स्पष्ट विचार व निर्धार, निस्सीम समाजकार्य या तत्त्वाचा सडेतोड प्रभाव पाडण्यासाठी, प्रगल्भ व अभिनयसंपन्न तगड्या कलाकाराची गरज, दिग्दर्शक राजदत्त यांनी डॉ. लागूची निवड करून पूर्ण केली. ‘हा धोंड्याला म्हणती देवता भगत धुंडती तया जोगता...’ अज्ञानी जनांना खरा ईश्वर बाबांनी उदाहरण देऊन पटवून दिले. ‘शिक्षण घ्यावे, व्हावे ज्ञानी । यासाठी ही झिजते वाणी’ बाबांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.dr shreeram lagoo ‘मी जातीचा धोबी देवा । धुवीन कपडा मळलेला..’ देवाला उद्देशून म्हणतात, मी तर जातीचा धोबी आहे, समाजातील मलिनता दूर करणे माझेच काम आहे. देव मंदिरात नसून माणसाच्या सेवेत व अंतःकरणात आहे, हा बाबांचा मुख्य संदेश डॉ. लागू यांनी अनोखा अभिनय करून निर्देशित केला. बहुआयामी डॉ. लागू यांनी बाबांच्या भूमिकेला उच्च व नैसर्गिक दर्जा मिळवून दिला. या चित्रपटाला राष्ट्रीय दर्जा मिळाला.‘तब्बेत बरी आहे ना? मी सोडायला येऊ का? काही अडचण’ (सिंहासन १९७९)
वरवर काळजीयुक्त वाटणारा हा संवाद सुचवितो की तुमची वेळ आता संपत आली, तुमची जागा घेण्यास मी तयार आहे. अर्थमंत्री विलासराव दाभाडेच्या भूमिकेत नेत्रातील मिस्किल भाव व उपरोधिक अंदाजात डॉ. लागूंचा हा संवाद रसिकांनी खूप पसंद केला. सत्तेसाठी धडपड व नैतिकतेचे पतन करणाऱ्या निगेटिव्ह भूमिकेतही कसदार आवाजात कुत्सित हास्यात व बेरक्या देहबोलीतून अप्रतिम परिणाम साधला. कावेबाज, मुरब्बी व धोरणी अर्थमंत्री, लागू यांनी पूर्ण ताकदीने उभा करताना वास्तवाचे दर्शन देत अनेक बारकावे टिपले.
‘जात व्यवहारातून जाते, पण.... मनातून जात नाही’ (मुक्ता, १९९४)
राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. वरील संवाद सिनेमाची मध्यवर्ती कल्पना आहे. एकीकडे संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार करणारे तर वैयक्तिक आयुष्यात जाती व्यवस्थेच्या नाईलाजात गुंतलेले आबासाहेब कणसे पाटील (डॉ. लागू) जेव्हा त्यांची नात मुक्ता, एक दलित कार्यकर्ता व एका अमेरिकन मित्राच्या सहवासात येते, तेव्हा तत्त्वाच्या निवडीपुढे होणारी चलबिचल अवस्था व बदलती मानसिकता संयतपणे चेहऱ्याद्वारे अभिनित करतात. श्रीराम लागू यांचे भारदस्त उमदे व्यक्तिमत्त्व कुठल्या तरी तेजाने वलयांकित होते. सकृतदर्शनी ते तत्त्वज्ञ भासायचे. बहुआयामी डॉक्टर मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्राला लाभलेले अभिनव रत्न होते.
‘विधात्या तू इतका कठोर का झालास... कोणाच्या पायावर? कोणाच्या? कोणाच्या?...’ अस्वस्थ मानसिकतेतील डॉ. लागू यांचा १९७० सालच्या ‘नटसम्राट’ नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर या पात्राचा चिरस्मरणीय संवाद कोण विसरेल?
श्रीराम बाळकृष्ण लागू या नटश्रेष्ठाचा जन्म १० नोव्हेंबर १९२७ रोजी साताऱ्यात झाला. पुण्यात भालचंद्र केळकर यांच्या नाट्यसंस्थेत नाटकात कामे केलीत. नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉक्टर झाले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंड, कॅनडा आदी ठिकाणी असताना पॉल मुनी या अभिनेत्याचा प्रभाव पडला. वैद्यकीय व्यवसाय सोडून पूर्णवेळासाठी नाट्य संस्थेत दाखल झाले. इथे ओशाळला मृत्यू (१९६९), नटसम्राट (१९७०) अशा अजरामर नाटकांचे शेकडो प्रयोग केलेत. १९६२ साली दीपा लागू सोबत विवाह. दोन मुले व एक मुलगी ही अपत्ये. डॉ. लागू यांनी हिंदी व मराठी मिळून सुमारे २५० चित्रपट केले. यशस्वी कलाकार असूनही त्यांचे पाय जमिनीवर होते. निरीक्षरवादी व निधर्मी तत्त्वज्ञानाचे ते खंदे पुरस्कर्ते होते. त्यांनी वैज्ञानिक मतांचे भांडवल मात्र केले नाही. ‘देवाला रिटायर करा’ हा बहुचर्चित लेख लिहून, पुरोगामी व तर्कसंगत सामाजिक कार्यासाठी आवाज उठवीत होते. त्यांना हिंदी चित्रपटासाठी एक व मराठीसाठी दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळालेत. रूपवेध प्रतिष्ठानाद्वारे अव्वल रंगकर्मींना तन्वीर पुरस्कार दिला जातो. ‘झाकोळ’ नावाचे पुस्तक व ‘लमाण’ नामे आत्मचरित्र लिहिले. थोर विचारांनी परिपूर्ण, सामाजिक तसेच देशविषयक भान ठेवणारे नटसम्राट डॉ. लागू यांनी १७ डिसेंबर २०१९ रोजी परमेश्वराला जाब विचारण्यासाठी जीवनातून एक्झिट घेतली. वर जाऊन विचारत असतील- ‘ज्याने आम्हाला जन्म दिला, तो तूही आम्हास विसरतोस! पण मग विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणाकरा... आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकी आदळायची...?’
पुणे । ७७७५९००८२४