मानोरा,
cotton-crops तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी यंदा पावसाअभावी व किडी-रोगामुळे मोठ्या अडचणीत असताना, ज्या शेतकर्यांनी कापसाचे पीक लावले आहे, ते शेतकरी सुद्धा पावसाअभावी हवालदिल झालेले असताना आता कापसावर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत तालुक्यातील शेतकर्यांची झाली आहे.
भुली शिवारात बेलोरा येथील महिला शेतकरी नीता उपाध्ये यांच्या चार एकर शेतात कापूस पीक लावलेले असून, आधीच पाऊस नसल्याने कोमेजत असलेल्या पिकावर आता लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. कापसाची पाने पिवळी-लाल होऊन झाडे वाळू लागली आहेत. जमिनीला भेगा पडल्या असून पिकात ओलावा अजिबात नाही. लाल्या रोगामुळे पाने लालसर होऊन गळून पडतात, बोंडे लागत नाहीत आणि उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येते. अवर्षणामुळे आधीच उत्पादन घटणार असताना आता रोगामुळे कापूस उत्पादक शेतकर्याचे पाय अधिक खोलात जात आहेत, अशीच गत तालुक्यातील इतरही शेतकर्यांची आहे.
यंदा मानोरा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन, तूर, कापूस ही सर्वच पिके धोक्यात आली आहेत. ज्या शेतकर्यांनी कर्ज काढून, महागडे बियाणे व औषधे घेऊन कापूस लावला, त्यांच्यावर दुहेरी संकट आले आहे.कृषी विभागाने तात्काळ भुली शिवारासह तालुक्यातील कापूस पट्ट्याची पाहणी करून लाल्या रोगावर नियंत्रणासाठी औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करावे आणि अवर्षणग्रस्त व रोगग्रस्त कापूस उत्पादकांना नुकसान भरपाई व विमा मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.