‘गीत गाता हूँ मैं’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
वर्धा,
geet-gaata-hoon-main-competition महावीर ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक मंडळ, वर्धा यांच्या वतीने ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘गीत गाता हूँ मैं’ विदर्भस्तरीय कराओके गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ज्येष्ठांच्या सुरांनी ही मैफल चांगलीच रंगली. उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष सुधीर पांगुळ होते. प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार पौर्णिमा राखुंडे उपस्थित होत्या. ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवांचे संस्कार आणि जीवनातून मिळणारे मार्गदर्शन हे समाजासाठी दीपस्तंभासारखे असते. वाढत्या वयातही कला, छंद आणि संगीताची साथ जीवनाला आनंदी व निरामय ठेवते, असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी केले. विशेष म्हणजे, नगराध्यक्ष पांगुळ यांनी स्पर्धेचे शीर्षकगीत स्वतः सादर करून कार्यक्रमाचे सांगीतिक उद्घाटन केले.
 
 
geet-gaata-hoon-main-competition
 
नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळताना प्रत्येकाने एखादा छंद जोपासावा. गायन आणि संगीताचा छंद स्वतःसह इतरांनाही आनंद देतो आणि मानसिक व शारीरिक आरोग्यासाठीही उपयुत ठरतो. एकाकी जीवन जगणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना आधार, संवाद आणि जिव्हाळ्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. विलास कुलकर्णी यांच्या कराओके गणेशवंदनेने वातावरण भतिमय झाले, तर प्रचिती चांदणे यांच्या नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढली. मंडळाचे कार्याध्यक्ष भगवानदास आहुजा यांनी मंडळाच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला.
 
 
स्पर्धेत तब्बल ६८ ज्येष्ठ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्राथमिक फेरीतील सादरीकरणातून अंतिम फेरीसाठी १० स्पर्धकांची निवड करण्यात आली. वयाच्या ९८व्या वर्षीही उत्साहाने भतिगीत सादर करणार्‍या राममोहन बैंदूर यांनी उपस्थितांची मने जिंकली. संगीतामुळे आजही आपले जीवन समृद्ध, आनंदी आणि निरामय असल्याची भावना त्यांनी व्यत केली.
 
 
अंतिम फेरीत अरुण सुरजुसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अजय चतारे यांनी द्वितीय, तर प्रकाश वाकेकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. गिरीश परटके, गणेश शर्मा, निवृत्ती कुंभारे, मिलिंद डहाके, अनंत चांदोरे, मनोहरसिंग जाधव आणि रवींद्र मत्तलवार यांना प्रोत्साहन पुरस्काराने गौरविण्यात आले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन अग्रवाल, प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपस्थित होते. वय वाढले तरी मनातील सूर कधीच वृद्ध होत नाहीत, याची प्रचिती देणारी ही सुरेल मैफल ठरली.