मुंबई
petrol diesel price today जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत चिंता वाढली आहे. इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अमेरिका, इराक आणि सौदी अरब यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच G7 देशांनी राखीव तेलसाठा बाजारात आणला असतानाही कच्च्या तेलाच्या किमतींवरील दबाव कमी झालेला नाही. दरम्यान, नायरा कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सरकारी तेल कंपन्याही अशीच दरवाढ करणार का, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
जागतिक बाजारातील घडामोडींमुळे ब्रेंट क्रूड ऑईलचा दर ९७.९० डॉलरवरून वाढून १०२.२५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. अमेरिकेतील WTI क्रूडचा दर मात्र ९२ डॉलरवरून काहीसा घसरून ९१.११ डॉलर प्रति बॅरल झाला. भारतीय क्रूड बास्केटची सरासरी किंमत ११६.०४ डॉलरच्या आसपास पोहोचली असून, OPECच्या कच्च्या तेलाचा दरही १११ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला आहे. अमेरिका-इराण संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारात अस्थिरता कायम आहे.
दरम्यान, होर्मुझ समुद्रधुनीतील संघर्षामुळे पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी सध्या बाजारात इंधनाचा पुरवठा सुरू आहे. आखाती देश, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातीने नवीन पाइपलाइनच्या माध्यमातून तेलपुरवठा वाढवला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून या पाइपलाइनद्वारे दररोज सुमारे १६.५ दशलक्ष बॅरल कच्चे तेल बाजारात येत असल्याचे सांगितले जात आहे. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात मार्चमध्ये हा पुरवठा सरासरी १०.५ दशलक्ष बॅरल इतका होता.
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांच्या दरफलकानुसार देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती सध्या मोठ्या प्रमाणात बदललेल्या नाहीत. मुंबईत पेट्रोल १११.२१ रुपये, तर डिझेल ९७.८३ रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये आणि डिझेलचा दर ९५.२० रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल १०७.७६ रुपये, तर डिझेल ९९.५५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ११३.५१ रुपये आणि डिझेल ९९.८२ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना दररोज पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही. इंडियन ऑईलच्या ग्राहकांना मोबाईलवर RSP असा संदेश टाइप करून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवल्यास आजचे दर एसएमएसद्वारे मिळतात. तसेच बीपीसीएलच्या ग्राहकांनी RSP असा संदेश ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवल्यानंतर कंपनीकडून अद्ययावत इंधन दरांची माहिती एसएमएसद्वारे दिली जाते.
जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतार आणि देशांतर्गत तेल कंपन्यांच्या निर्णयांमुळे आगामी काळात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये बदल होतो का, याकडे वाहनचालक आणि सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष लागले आहे.