घरी लावा कोरफडीचे रोप; केसांच्या निगेसाठी असा करा नैसर्गिक वापर

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
aloe vera plant त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपायांचा वापर करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. त्यात कोरफडीला विशेष महत्त्व दिले जाते. घरच्या घरी सहज वाढवता येणारे कोरफडीचे रोप केवळ सजावटीपुरते मर्यादित नसून, त्याच्या गराचा वापर केसांच्या निगेसाठीही केला जातो. प्रदूषण, ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि विविध रासायनिक उत्पादनांचा वापर यामुळे केस गळणे, कोरडेपणा आणि कोंडा यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. अशावेळी कोरफडीचा गर केसांच्या निगेसाठी वापरला जातो.
 

aloe vera plant 
 
कोरफडीत व्हिटॅमिन ए, सी, ई, बी१२, फॉलिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याचे सांगितले जाते. हे घटक टाळूच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या मुळांच्या निगेसाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे अनेकजण कोरफडीचा वापर हेअर मास्क किंवा इतर घरगुती उपायांमध्ये करतात.
घरी कोरफडीचे रोप लावायचे असेल तर तळाशी पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र असलेली कुंडी निवडावी. मातीत वाळू आणि कंपोस्ट मिसळून हलकी माती तयार करावी. त्यानंतर कोरफडीचा छोटा मुळासह भाग मातीत लावावा. या रोपाला अतिपाणी देणे टाळावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणी देणे पुरेसे ठरते. कमी सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी कुंडी ठेवली तरी रोपाची वाढ होऊ शकते.
केसांसाठी कोरफडीचा वापर करण्याचे अनेक घरगुती मार्ग आहेत. ताज्या कोरफडीचा गर थेट केसांच्या मुळांवर लावून साधारण ३० मिनिटांनंतर सौम्य शाम्पूने केस धुता येतात. या वापरामुळे केसांना मऊपणा आणि चमक मिळण्यास मदत होऊ शकते.
कोरफडीचा गर आणि खोबरेल तेल यांचे मिश्रणही केसांच्या निगेसाठी वापरले जाते. यासाठी दोन चमचे कोरफडीचा गर आणि एक चमचा खोबरेल तेल एकत्र करून टाळूवर हलक्या हाताने मालिश करता येते. तसेच कोरफडीच्या गरात दही मिसळून तयार केलेला हेअर पॅक कोरडे केस आणि कोंड्यासाठी वापरला जातो.
केस गळण्याची समस्या असलेल्या काहीजणांकडून कोरफडीच्या जेलमध्ये कांद्याचा रस मिसळून वापर केला जातो. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावले जाते. याशिवाय कोरफडीचे जेल पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत भरता येते आणि केस धुतल्यानंतर त्याचा हलका स्प्रे करता येतो. कोरफडीचे जेल आणि ऑलिव्ह ऑइलचे मिश्रणही केसांच्या निगेसाठी वापरले जाते.
मात्र, कोणताही घरगुती उपाय प्रत्येक व्यक्तीला सारखाच परिणाम देईल असे नाही.aloe vera plant संवेदनशील त्वचा किंवा टाळू असल्यास कोरफड अथवा इतर घटक वापरण्यापूर्वी छोट्या भागावर चाचणी करणे योग्य ठरते. केस गळण्याची किंवा टाळूच्या समस्येची तीव्रता जास्त असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.