रायगड
raigad रायगड किल्ल्यावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या टकमक टोकावरून उडी घेत जीवन संपविलेल्या ३७ वर्षीय युवकाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला अखेर यश आले. टकमक टोकाच्या खाली निजामपूरच्या दिशेला असलेल्या सुमारे ८०० फूट खोल दरीत हा मृतदेह आढळून आला. प्रतिकूल हवामान, दाट धुके आणि अवघड भौगोलिक परिस्थितीचा सामना करत बचाव पथकाने ही शोधमोहीम पूर्ण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग पांचाळ हा ३७ वर्षीय युवक शनिवारी रायगड किल्ल्यावर आला होता. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याने आपल्या कुटुंबीयांना फोन करून आपण टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच त्याचा मोबाइल बंद झाला. त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीय चिंतेत पडले आणि त्यांनी तातडीने रायगडाच्या पायथ्याशी धाव घेतली. तेथे सुयोगची दुचाकी आढळून आली; मात्र सुयोगचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच महाड raigad तालुका पोलिसांसह स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन बचाव पथक रायगडावर दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत सुयोगचा शोध घेण्यात आला. मात्र, रात्रीचा दाट अंधार, धुके आणि टकमक टोकाखालील अत्यंत खोल व धोकादायक दरी यामुळे बचाव पथकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे रात्री शोधमोहीम तात्पुरती थांबवण्यात आली.रविवारी सकाळी उजाडताच बचाव पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. दरीचा विस्तीर्ण परिसर आणि खोल भाग तपासण्यासाठी आधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून शोध घेत असताना निजामपूरच्या दिशेला सुमारे ८०० फूट खोल दरीत सुयोगचा मृतदेह असल्याचे आढळून आले.मृतदेह सापडला असला तरी तो दरीतून सुरक्षितपणे वर आणणे हे बचाव पथकासमोर मोठे आव्हान आहे. मृतदेह आढळलेल्या ठिकाणी घनदाट झाडी असून उतार अत्यंत तीव्र आहे. दरीची खोली आणि कड्यांची अवघड रचना यामुळे खाली उतरणे तसेच मृतदेह बाहेर काढणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे बचाव पथकाकडून अत्यंत काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.या घटनेमुळे रायगड परिसरात तसेच शिवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सुयोग पांचाळ याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामागील कारणाचा पोलीस तपास करत आहेत.