नागपूर,
Rajbhau Deshpande passes away राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक राजाभाऊ देशपांडे यांचे आज रविवारी ४ ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजता अल्प आजाराने खापरी स्थित विवेकानंद रुग्णालयात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. राजाभाऊ यांनी आपले संपूर्ण आयुष्य संघाच्या प्रचारासाठी झोकून दिले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक स्वयंसेवकांवर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव सायंकाळी ५ वाजेपासून रेशीमबागमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. अनेक स्वयंसेवकांनी तेथे अन्त्यदर्शनन घेतले. उद्या सोमवारी सकाळी ८ वाजता रेशीमबागमधून अन्त्ययात्रा निघून गंगाबाई घाटावर अंन्त्यसंस्कार करण्यात येईल.
वासुदेव उर्फ राजाभाऊ देशपांडे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्याातील मार्डी गावात ४ जानेवारी १९४७ रोजी झाला. पूजनीय बाळासाहेब देवरस यांच्या आग्रहाने ते १९६७मध्ये नागपूर येथून प्रचारक निघाले. सुरुवातीस अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका प्रचारक होते. १९६९ ते १९७८ अकोला जिल्हा प्रचारक होते. आणिबाणी काळात अकोला जिल्ह्यात भूमिगत राहून कार्य केले. १९७८ ते ८२ चंद्रपूर जिल्हा प्रचारक होते. १९८२ पासून किसान संघाचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. १९९६ ते २००२ नागपूरला प्रधान कार्यालय प्रमुख होते. २००२ ते २००४ संभाजीनगर कार्यालय प्रमुख होते. नंतर रेशीमबागमध्ये व्यवस्थेत राहिले. १९८८ पासून नागभिड येथील गोंडवाना विकास संस्थेचे सदस्य व नंतर २०२२ पासून आजपर्यंत अध्यक्ष म्हणून यशस्वी काम केले.