अमेरिकेची भूमिका बदलतेय, चीनचा प्रभाव वाढतोय

जयशंकरांनी सांगितली बदलत्या जगाची दिशा

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली
s jaishankar बदलत्या जागतिक राजकारणामुळे जगातील शक्तिसंतुलन वेगाने बदलत आहे. अमेरिकेची जागतिक भूमिका बदलत असून चीनचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. अमेरिका आणि चीनमधील स्पर्धेचा परिणाम केवळ या दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर जगभरातील देशांच्या धोरणांवरही त्याचा प्रभाव पडत आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित म्युनिक लीडर्स मीटिंग २०२६च्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
 

s jaishankar on us china rivalry: america 
जयशंकर यांच्या मते, अमेरिकेच्या जागतिक भूमिकेत मोठा बदल होत आहे. हा बदल अमेरिकेने स्वतःच्या निर्णयातून स्वीकारला आहे. दुसरीकडे चीनचा उदय हा जागतिक समीकरणांमधील महत्त्वाचा बदल ठरत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढती स्पर्धा जगातील इतर देशांच्या संबंधांवर आणि निर्णयप्रक्रियेवर परिणाम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक देश आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याचा आणि साधनांचा आपल्या हितासाठी वापर करत आहे. पुरवठादाराकडे अधिक ताकद आहे की खरेदीदाराकडे, उत्पादनावर नियंत्रण महत्त्वाचे आहे की मोठ्या बाजारपेठेतील स्थान, यावर देशांचा प्रभाव ठरत असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. विविध क्षेत्रांमध्ये ज्याच्याकडे अधिक नियंत्रण आणि निर्णयक्षमता आहे, तो आपला प्रभाव अधिक प्रभावीपणे वापरू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
अमेरिका आणि चीनमधील स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जगाला संतुलित परिस्थितीची गरज असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. ना अतितणावाची स्थिती हवी, ना एखाद्या एका शक्तीचे वर्चस्व निर्माण होईल अशी परिस्थिती, अशी भूमिका त्यांनी मांडली. उभरते आणि मध्यम शक्तीचे देश कोणत्याही एका गटात पूर्णपणे सामील होण्याऐवजी आपल्या हितानुसार वेगवेगळ्या देशांशी संबंध ठेवत आहेत. अर्थव्यवस्था, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उभरत्या देशांनी शांतता आणि सुरक्षा, पुरवठा साखळी, उच्च तंत्रज्ञानावरील उत्पादन, आरोग्य, कनेक्टिव्हिटी, हवामान, संरक्षण आणि अंतराळ अशा क्षेत्रांत परस्पर सहकार्य वाढवावे, असे आवाहनही जयशंकर यांनी केले. जगातील एखाद्या भागात संघर्ष किंवा तणाव निर्माण झाल्यास मोठ्या शक्तींव्यतिरिक्त इतर देशही आपली संसाधने एकत्र करून परस्परांच्या कूटनीतीला पाठबळ देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
जागतिक प्रभाव निर्माण करण्यासाठी सर्वात मोठी महासत्ता असणे आवश्यक नाही, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. सेमीकंडक्टर आणि मशीन निर्मितीचे उदाहरण देताना त्यांनी तैवानमधील TSMC आणि नेदरलँड्समधील ASMLचा उल्लेख केला. अत्याधुनिक चिप निर्मिती आणि चिप बनवणाऱ्या प्रगत यंत्रांच्या क्षेत्रात या कंपन्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने औषधे आणि API उत्पादन विविध देशांमध्ये विभागण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
बदलत्या जागतिक s jaishankar  व्यवस्थेत क्वाड, ब्रिक्स आणि विविध कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या माध्यमातून देशांमध्ये नवे सहकार्य निर्माण होत असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर, इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आणि नॉर्दर्न सी रूट यांसारखे मार्ग महत्त्वाचे ठरत आहेत. इंटरनॅशनल सोलर अलायन्स आणि कोअॅलिशन फॉर डिझास्टर रेजिलिएंट इन्फ्रास्ट्रक्चर यांचा त्यांनी भारताच्या पुढाकाराची उदाहरणे म्हणून उल्लेख केला.
भारत आणि युरोपीय संघादरम्यान प्रस्तावित मुक्त व्यापार करारालाही जयशंकर यांनी महत्त्व दिले. हा करार दोन्ही देशांमधील संबंधांसाठी मोठा बदल घडवणा