'सहल’मधून पुन्हा जागणार शाळेच्या दिवसांच्या आठवणी

९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
मुंबई
sahal movie शाळेची सहल म्हटली की विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो धमालमस्तीचा, गमतीजमतींचा आणि मित्रमैत्रिणींसोबतच्या अविस्मरणीय क्षणांचा काळ. याच शालेय आठवणींना केंद्रस्थानी ठेवणारा ‘सहल’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, ९ ऑक्टोबरला हा चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
 

sahal-marathi-movie-release-school-trip-ganpatipule
के. स्वामिनी फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुकुंद वसंत खुपेरकर यांनी केले आहे. प्रशांत केसरकर आणि विलास केसरकर हे चित्रपटाचे निर्माते असून, मुकुंद वसंत खुपेरकर यांनी सहनिर्मात्याची जबाबदारीही सांभाळली आहे. चित्रपटाची मूळ पटकथाही त्यांनीच लिहिली आहे.
‘सहल’मध्ये देविका दफ्तरदार यांच्यासह सिद्धेश मुकुंद खुपेरकर, कल्याणी अडसुळ, आदित्य खुपेरकर, प्रज्वल सुतार, सेजल कोरे, सचिन मोरे, शिवाजी पाटील आणि रवि कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिद्धेश मुकुंद खुपेरकर या चित्रपटातून मुख्य नायक म्हणून पदार्पण करत आहे. यापूर्वी त्याने झी मराठीवरील प्रसिद्ध ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत लहान राणाच्या भावाची, म्हणजेच सुरजची भूमिका साकारली होती. तसेच डॉ. केशव हेगडेवार यांच्या बालपणीची भूमिकाही त्याने साकारली आहे.
चित्रपटाचे छायांकन अभिषेक शेटे यांनी केले असून, संकलन चंद्रशेखर गुरव यांनी केले आहे. सुहास मुंढे आणि समीर पठाण यांनी लिहिलेल्या गीतांना डॉ. जय भीम शिंदे यांनी संगीत दिले आहे. चित्रपटातील गीते सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत. मुकुंद वसंत खुपेरकर यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली असून, श्रेया चव्हाण यांनी वेशभूषा, आदित्य चव्हाण यांनी ध्वनिसंयोजन आणि प्रशांत कुंभार यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे.
चित्रपटाची कथा एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणपतीपुळे सहलीभोवती फिरते. सहलीला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पैसे द्यावे लागतात; मात्र प्रत्येकाच्या घरची परिस्थिती आणि पालकांची भूमिका सारखी नसते. त्यातच विद्यार्थ्यांमधील अंतर्गत संघर्ष, विशेषतः मुलींवरून होणारे वाद, तसेच सहलीसाठी पैसे देण्यास काही पालकांचा असलेला विरोध यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची बनते. या सगळ्या घटनांमधून विद्यार्थ्यांचे भावविश्व आणि त्यांच्या वयातील निरागसता चित्रपटात मांडण्यात आली आहे.शालेय जीवनातील समज-गैरसमज, त्या वयातील उत्साह, मैत्री, मुलींविषयी निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून होणारे छोटे-मोठे वाद यांचा अनुभव ‘सहल’मधून पुन्हा घेता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक, शिक्षक आणि सभोवतालचे वातावरण यांची भूमिका किती महत्त्वाची असते, याचाही कथानकातून वेध घेण्यात आला आहे. त्यामुळे आज पालकत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रेक्षकांनाही हा चित्रपट आपल्या शालेय दिवसांच्या आठवणींशी जोडून घेईल, अशी अपेक्षा आहे.शालेय जीवनातील निरागस आठवणी आणि विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला मनोरंजक कथानकाची जोड देत ‘सहल’ची मांडणी करण्यात आली आहे. त्याला कलाकारांच्या अभिनयाची साथ लाभली आहे. त्यामुळे गणपतीपुळ्याच्या सहलीच्या निमित्ताने पडद्यावर उलगडणारा हा शालेय प्रवास प्रेक्षकांसाठी आठवणींना उजाळा देणारा ठरणार का, याची उत्सुकता आहे. आता ९ ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच त्याचा अनुभव घेता येणार आहे.