२२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा संशय

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
sambhajinagar accident छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिसगाव–वडगाव रस्त्यावरील संविधान चौकात शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात मकरंद संजय जाधव (२२) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, धडकेनंतर मकरंदच्या दुचाकीचे अक्षरशः दोन तुकडे झाले. तसेच रस्त्यालगत असलेली सिमेंटची सुरक्षा भिंतही धडकेच्या जोरामुळे तुटून खाली पडली.
 

sambhajinagar accident 22-year-old dies in horrific crash, family suspects foul play 
मिळालेल्या माहितीनुसार, मकरंद दुचाकीवरून जात असताना संविधान चौक परिसरात हा अपघात झाला. जोरदार धडकेचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मकरंद गंभीर जखमी झाला होता. नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मकरंदच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी परिसरातील प्रमुख मार्ग तसेच दुकानांमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हा अपघात नेमका कशामुळे झाला किंवा त्यामागे घातपाताचा काही प्रकार आहे का, या दोन्ही शक्यता तपासाच्या केंद्रस्थानी ठेवून पोलीस पुढील तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.