‘भारतामध्ये आता शांती जाणवत नाही

संजय दत्तच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
मुंबई
sanjay dutt बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या चित्रपटांइतकाच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. आता भारतातील शांततेबाबत केलेल्या त्याच्या एका वक्तव्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. ‘शेखर टुनाईट’ या कार्यक्रमातील गांधी जयंती विशेष भागात संजय दत्त सहभागी झाला होता. यावेळी त्याने भारतात सध्या शांतता जाणवत नसल्याचे मत व्यक्त केले. त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, काही नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकाही केली आहे.
 

sanjay-dutt-india-peace-statement-controversy-shekhar-suman-show 
गांधी जयंतीनिमित्तच्या विशेष भागात संजय दत्त ‘मुन्नाभाई’च्या लूकमध्ये सहभागी झाला होता. कार्यक्रमादरम्यान त्याने काही काळासाठी स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेतही सादर केले. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संवादाचे व्यंग्यात्मक सादरीकरण करण्यात आले. टॅरिफच्या मुद्द्यावरही विनोदी भाष्य करण्यात आले. या संपूर्ण सादरीकरणात ‘गांधीगिरी’चा संदर्भ वारंवार देण्यात आला असून, कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मॉक पीएम स्पीच सुरू होण्यापूर्वी संजय दत्तने भारताविषयी बोलताना शांततेचा मुद्दा उपस्थित केला. भारतात चांगली माणसे मोठ्या संख्येने आहेत, भारतीयांचे मन मोठे आहे आणि देशात येणाऱ्या पाहुण्यांचे आनंदाने स्वागत केले जाते, असे त्याने म्हटले. भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या असून, हीच उदार वृत्ती कायम राहावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.
मात्र, याचवेळी ‘मला आमच्या देशात आता ती शांतता जाणवत नाही’ असे संजय दत्तने म्हटल्याचे समोर आले आहे. देशात शांतता पुन्हा लवकर परत यावी, अशी प्रार्थना करत असल्याचेही त्याने नमूद केले. त्याच्या या वक्तव्याचा नेमका संदर्भ काय होता, यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
संजय दत्तच्या या विधानावर sanjay dutt काही नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित करत भारतात नेमकी कोणत्या प्रकारची अशांतता दिसते, असा सवाल केला आहे. भारताबद्दल अशा प्रकारचे विधान केल्याबद्दल त्याच्यावर टीकाही होत आहे. त्यामुळे गांधी जयंती विशेष कार्यक्रमातील त्याच्या वक्तव्याने मनोरंजनविश्वाबरोबरच सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले आहे.संजय दत्तचे कुटुंब दुबईत स्थायिक असून, त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. पुण्यातील येरवडा कारागृहातील शिक्षा पूर्ण केल्यानंतरही त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक वक्तव्ये चर्चेचा विषय ठरली आहेत. आता भारतातील शांततेबाबतच्या त्याच्या वक्तव्यामुळे त्याच्या नावाची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.