बिबट्याचा हल्ला : दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
सातारा
satara leopard attack शिवथरजवळील न्हाळेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (३ ऑक्टोबर) रात्री घडली. जय खंडागळे हा मुलगा रात्री घराबाहेर खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर बिबट्याने त्याला घराजवळील उसाच्या शेतात फरफटत नेले. ग्रामस्थांनी पाठलाग करून बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत जयला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 

satara leopard attack 2-year-old boy killed in nhalewadi, village in panic 
घटनेच्या वेळी न्हाळेवाडी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. गावात अंधाराचा फायदा घेत बिबट्या दबा धरून बसला होता. घराच्या परिसरातून बाहेर आलेल्या चिमुकल्यावर त्याने हल्ला केला आणि सुमारे ५०० मीटर अंतरावरील उसाच्या शेतात नेले, असे ग्रामस्थांनी सांगितले.
हल्ल्याची माहिती मिळताच गावातील तरुणांनी हातात टॉर्च घेऊन बिबट्याचा शोध सुरू केला. एका ओढ्याजवळ बिबट्या चिमुकल्याला घेऊन बसल्याचे दिसल्यानंतर तरुणांनी आरडाओरड करत त्याचा पाठलाग केला. गोंधळ झाल्यानंतर बिबट्या तेथून पळून गेला. मात्र, या हल्ल्यात जय गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेनंतर न्हाळेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये वनविभाग आणि महावितरणविरोधात संताप व्यक्त होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गावात या बिबट्याचा वावर असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वारंवार मागणी आणि तक्रारी करूनही वनविभागाने ठोस उपाययोजना केली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी satara leopard attack दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत चिमुकल्याचे पार्थिव ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वन्यप्राण्यांचा गावातील वावर वाढत असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात तातडीने पिंजरा लावावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी न्हाळेवाडीत दाखल झाले. उसाच्या शेतांसह ओढ्यांच्या परिसरात बिबट्याचा माग काढण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्री घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी आणि एकट्याने शेतात जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.