गिलचा ‘विराट’ विक्रम!

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
shubman-gill भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली. या मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन गिलने आपल्या फलंदाजीची ताकद दाखवत दोन शतके झळकावली. पहिल्या सामन्यात शतक ठोकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने विक्रमी द्विशतकाची नोंद केली. तिसऱ्या सामन्यात मात्र गिलला केवळ एक धाव करता आली. असे असतानाही त्याने या मालिकेत असा विक्रम केला, जो यापूर्वी कोणत्याही भारतीय कर्णधाराला करता आलेला नव्हता.
 
shubman-gill
 
गिलने तीन सामन्यांत एकूण ३३४ धावा करत कर्णधार म्हणून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ब्रेंडन टेलरचा १५ वर्षे जुना ३१० धावांचा विक्रम मागे टाकला. गिलने मालिकेत १६७च्या सरासरीने धावा केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत ३०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो केवळ दुसरा कर्णधार ठरला आहे. या विक्रमाच्या यादीत वेस्ट इंडिजचा शे होप २७८ धावांसह तिसऱ्या, पाकिस्तानचा बाबर आझम २७६ धावांसह चौथ्या, तर संयुक्त अरब अमिरातीचा कुर्रम खान २७० धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. गिलच्या आधी २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.
 
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे गिलला मालिकावीर पुरस्कारही मिळाला. एकदिवसीय कारकिर्दीत हा त्याचा सातवा मालिकावीर पुरस्कार ठरला. यासह त्याने सौरव गांगुली, युवराज सिंग आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत गिल केवळ सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या मागे आहे.