कोलंबो,
sri-lanka पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आगामी एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेने आपला संघ जाहीर केला असून माजी कर्णधार चरित असलंकाला त्यातून वगळण्यात आले आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात ही तिरंगी मालिका होणार आहे. असलंकाने आतापर्यंत ८८ एकदिवसीय सामने खेळले असून त्याची सरासरी ४०.५५ आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. तीन सामन्यांत त्याने अनुक्रमे १, ११ आणि ७ धावा केल्या. श्रीलंकेने इंग्लंडविरुद्धची ही मालिका २-१ ने गमावली होती.

असलंकाच्या जागी फलंदाज अविष्का फर्नांडोला पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे, तर अष्टपैलू साहन अराचिगेचेही संघात पुनरागमन झाले आहे. वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाही. इंग्लंड दौऱ्यादरम्यान त्याला मांडीच्या मागील बाजूस दुखापत झाली होती. उर्वरित संघातील बहुतांश खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळलेलेच आहेत. देशांतर्गत स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर अविष्का फर्नांडोला पुन्हा संधी मिळाली आहे. त्याने मेजर क्लब मर्यादित षटकांच्या स्पर्धेत सात डावांत ६३.८५च्या सरासरीने ४४७ धावा केल्या आहेत.
दरम्यान, असलंकाला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतूनही बाहेर ठेवण्यात आले आहे. इंग्लंड दौऱ्यात तो श्रीलंकेचा उपकर्णधार होता. नियमित कर्णधार कुसल मेंडिस पायाच्या दुखापतीमुळे अनुपलब्ध असताना असलंकाने टी-२० सामन्यांत संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, आता त्याला दोन्ही मालिकांसाठी संघात स्थान मिळालेले नाही.
पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील तिरंगी एकदिवसीय मालिका १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होईल. पहिल्या टप्प्यातील सामने रावळपिंडी येथे खेळवले जाणार असून त्यानंतर सामने लाहोरमध्ये होतील. मालिकेचा अंतिम सामना ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व कुसल मेंडिसकडे सोपवण्यात आले असून पथुम निस्संका, अविष्का फर्नांडो, कामिल मिश्रा, पवन रत्नायके, साहन अराचिगे, कामिंदू मेंडिस, जनिथ लियानागे आणि दसुन शनाका यांचा संघात समावेश आहे. दुनिथ वेलालागे, महेश थीक्षाना, सचिंदू कोलंबोगे, दुशमंथा चमीरा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका आणि इशान मलिंगा हेही संघाचा भाग आहेत.