चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मंगरूळनाथ,
two-killed-in-st-bus-collision गोलवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोघांना भरधाव एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलवाडी फाट्यानजिक फिर्यादी सुनील शामराव राठोड यांच्या शेताजवळ त्यांचा जेसीबी चालक धनवेश्वर राणा जगदीश राणा (वय ४०) रा. डेबो, जि. हजारीबाग, झारखंड आणि ट्रॅक्टर चालक गणेश डिगांबर जगताप (वय ४५) रा. सवासनी ता. मंगरूळनाथ हे मोटारसायकलवरून गोलवाडीवरुन मंगरूळनाथकडे येत होते.

यावेळी फिर्यादीने आवाज दिल्याने दोघे रस्त्याच्या कडेला थांबून बोलत होते. दरम्यान वाशीमकडून मंगरूळनाथकडे येणार्या परभणी ते वरुड एमएच १४ एमटी ०२७१ क्रमांकाच्या एसटी बसच्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांना धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी गणेश जगताप यांना तपासून मृत घोषित केले. तर धनवेश्वर राणा यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याचाही मृत्यू झाला. उपरोक्त घटनेबाबत मंगरुळनाथ पोलिसांनी एसटी बस चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रन्नु रायलीवाले करीत आहे.