पूर्व विदर्भात उभारणार हायटेक ’उमेद मॉल’

ग्रामीण महिलांना हक्काची बाजारपेठ

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
नागपूर,
umed-mal maharashtraग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी आणि भव्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने ’उमेद मॉल’ योजनेचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यांचा समावेश असून प्रत्येक जिल्ह्यात सुमारे २० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक मॉल उभारण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातच मंजुरी मिळाल्याने आता संपूर्ण विदर्भातील ग्रामीण महिला उद्योजकांना मोठे व्यासपीठ मिळणार आहे
 
 
mall
 
 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून ग्रामविकास विभागाने शासन आदेश जारी केला आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील उर्वरित २१ जिल्ह्यांमध्ये मॉल उभारणार असल्याने आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ’उमेद मॉल’ साकारणार आहे.
 
 
 
कसा असेल हायटेक ’उमेद मॉल’?
ग्रामविकास विभागाने मॉलसाठी सुधारित आराखडा तयार केला आहे. एकूण जागेपैकी ५० टक्के जागा मोकळ्या मॉल इमारतीसाठी, ३० टक्के वाणिज्यिक व्यवहारांसाठी तर २० टक्के जागा सोयी-सुविधांसाठी राखीव राहणार आहे.
 
 
ग्राहकांसाठी ५० चारचाकी आणि १०० दुचाकींसाठी पार्किंग, सीसीटीव्ही सुरक्षा कक्ष, स्वच्छतागृहे, स्तनदा मातांसाठी ’हिरकणी कक्ष’ आणि दिव्यांगांसाठी रॅम्प-रेलिंगची सुविधा असेल. केवळ विक्रीच नव्हे तर प्रशिक्षणासाठी १०० ते १५० आसन क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल, विश्रांती कक्ष आणि आधुनिक प्रशिक्षण केंद्रही उभारले जाणार आहे.
 
 
विदर्भातील महिलांना फायदा
सध्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३५१ तालुक्यांमध्ये ’उमेद’ अभियान सुरू आहे. विदर्भात विशेषतः गडचिरोलीतील बांबू उत्पादने, चंद्रपुरातील तेंदूपत्ता व हस्तकला, गोंदियातील तांदूळ प्रक्रिया उत्पादने आणि भंडाऱ्यातील लोणचे-पापड उद्योगांना या मॉलमुळे थेट शहरी ग्राहक मिळणार आहेत.जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. जिल्हास्तरावर स्वतंत्र विक्री केंद्र मिळाल्याने मध्यस्थांशिवाय महिलांना योग्य भाव मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.