महिलेला 98 हजार रुपयांचा गंडा

आरोपी भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
ब्रम्हपुरी,
woman-swindled-out-of-98000 घरातील अडीअडचणी सोडवण्याची बतावणी करीत भोंदूबाबाने एका महिलेला तब्बल 98 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना तालुक्यातील गांगलवाडी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिला संध्या मनोहर मशाखेत्री (रा. गांगलवाडी) यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाविरोधात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
तालुक्यातील गांगलवाडी गावात 19़ सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती भिक्षा मागण्यासाठी आल्या होत्या. त्यातील एका व्यक्तीला पीडित महिलेने 10 रुपये भिक्षा दिली. त्यानंतर त्या भोंदूबाबाने महिला घरी एकटी असल्याचे बघून, तुमच्या घरात किडा लागला आहे, पूजा करावी लागेल, असे सांगत त्याने महिलेकडून पाणी, अगरबत्ती, तांदूळ आणि धागा मागवून घेतला. काही भोंदूगिरीचे प्रकार करून त्याने महिलेकडून पूजा आणि उपायांच्या नावाखाली पहिल्याच दिवशी रोख 8 हजार रुपये लाटले. एवढ्यावरच तो भोंदूबाबा थांबला नाही. त्याच दिवशी रात्री त्याने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून महिलेला अधिक घाबरवले. तुमच्या नवर्‍याची प्रकृती बरी करण्यासाठी ‘अबुस बुत्ती’ नावाचे महागडे औषध लागेल, असे सांगितले. हे औषध ब्रम्हपुरी येथील वडसा मार्गावरील दुकानात मिळेल, असे सांगून दुकानदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. भोंदूबाबाच्या सांगण्यावरून महिलेने त्या दुकानात जाऊन दोन टप्प्यांत तब्बल 38 हजार 115 रुपयांची औषधे विकत घेतली. औषधे देऊनही समाधान न झालेल्या या भोंदूबाबाने 1 ऑक्टोबर रोजी पुन्हा फोन केला. घराची संपूर्ण पूजा करण्यासाठी सोने आणि 55 हजार रुपये लागतील, असेही सांगितले.
 
 
घाबरलेल्या महिलेने तळोधी गावातील पाण्याच्या टाकीजवळ जाऊन त्या बाबाला 30 हजार रुपये रोख आणि 12 ग्रॅम सोन्याचे दागिने दिले. मी दर्ग्यात जाऊन पूजा करतो आणि सायंकाळी सोने-पैसे परत करतो. तोपर्यंत घरात खड्डा खोदून ठेव, असे सांगून तो भोंदूबाबा आपल्या दुचाकीवरून निघून गेला. मात्र, सायंकाळ झाली तरी बाबा परत आलाच नाही आणि त्याचा फोनही बंद येऊ लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने थेट ब्रम्हपुरी पोलिस ठाणे गाठले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून शनिवारी ब्रम्हपुरी पोलिसांनी भोंदूबाबाविरुद्ध कलम 318 (4) अन्वये गुन्हा दाखल केला.