लखनौ
yogi adityanath गेल्या काही वर्षांत देशातील अनेक शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या नावांमध्ये बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही उस्मानाबादचे नामकरण धाराशिव, अहमदनगरचे अहिल्यानगर, तर औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. नावबदलाच्या या निर्णयांवर काही ठिकाणी विरोध, तर काही ठिकाणी समर्थन पाहायला मिळाले. आता या यादीत उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्याचीही भर पडणार आहे.
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तयार होत असतानाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भदोही जिल्ह्याच्या नामकरणाची घोषणा केली आहे. भदोहीचे नाव बदलून ‘संत रविदास नगर भदोही’ करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. भदोही येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली.
यापुढे भदोही जिल्ह्याची ओळख ‘संत रविदास नगर भदोही’ या नावाने केली जाईल, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेमुळे उत्तर प्रदेशातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते तब्बल १,३४० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. भदोहीच्या विकासाबाबतही त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. ‘संत रविदास नगर भदोही’चा विकास मिर्झापूर आणि वाराणसी सिल्क क्लस्टरच्या धर्तीवर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील विविध शहरांच्या नावबदलावरून यापूर्वी राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा रंगली आहे. काही ठिकाणी जुन्या नावांशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ पुढे करत नामकरणाला विरोध करण्यात आला, तर काही ठिकाणी नव्या नावाचे समर्थन करण्यात आले. महाराष्ट्रातील धाराशिव, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या नामकरणांनंतर आता उत्तर प्रदेशातील भदोईच्या प्रस्तावित नामकरणाचीही चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी केलेली ही घोषणा राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. नामकरणासोबतच जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.