मुंबई,
3-year-llb-admission-2026राज्यातील तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीअखेर आतापर्यंत १८ हजार २८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. राज्यातील २२४ विधी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या २३ हजार ४६८ जागांपैकी ५ हजार १८८ जागा अद्याप रिक्त असून, या जागांसाठी सुरू असलेल्या संस्थात्मक फेरीतील प्रवेशाचा ६ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून ४९ हजार ८४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तिसऱ्या फेरीसाठी २२४ महाविद्यालयांमध्ये १२ हजार ७६७ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ११ हजार ७५६ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली.
यातील ५ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला. पहिल्या फेरीत ५ हजार ७६५, दुसऱ्या फेरीत २ हजार ५१२ आणि तिसऱ्या फेरीत ५ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. अशा प्रकारे तीन नियमित फेऱ्यांमध्ये एकूण १४ हजार १६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यानंतर ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान संस्थात्मक फेरीतील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. या फेरीत आतापर्यंत ४ हजार ११९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे नियमित तसेच संस्थात्मक फेरीतील प्रवेशांची संख्या १८ हजार २८० झाली आहे. दरम्यान, उपलब्ध २३ हजार ४६८ जागांपैकी अद्याप ५ हजार १८८ जागा रिक्त असून, त्यासाठी संस्थात्मक फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम संधी विद्यार्थ्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे.