वॉशिंग्टन,
Al-Qaeda's shocking warning अल-कायदाने फ्लाय दुबईच्या विमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानी पायलट हिमामी अल हमामी याचे कौतुक केले आहे. भारतीय पायलट स्मित माछर यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबतही दहशतवादी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे. अल-कायदाच्या येमेनमधील शाखेने आपल्या साप्ताहिक ‘अल-बयान’ या नियतकालिकात यासंदर्भात लेख प्रसिद्ध केला असून, भविष्यात अशा प्रकारचे आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. वृत्तानुसार, अल-कायदाच्या येमेन शाखेने प्रसिद्ध केलेल्या लेखात युद्ध अद्याप संपलेले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. झायोनिस्ट, अमेरिकन आणि इस्लामविरोधी गटांच्या सैन्याला घेऊन जाणारी विमाने अजूनही आकाशात उड्डाण करत आहेत आणि त्यांच्यावर हल्ल्याचा धोका कायम असल्याचे संघटनेने म्हटले आहे. ११ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनांचा संदर्भ देत भविष्यात पुन्हा अशाच घटना घडतील, असा इशाराही या लेखातून देण्यात आला आहे.
हिमामी अल हमामीचा अल-कायदाशी पूर्वीपासून संबंध असल्याचे दर्शवणारे अनेक पुरावे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याच्याशी संबंधित डिलीट करण्यात आलेल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर कट्टरतावादी स्वरूपाची सामग्री आढळली होती. या अकाउंट्समध्ये कॉकपिटमधून एल अल आणि अर्किया या विमानांकडे झूम करतानाचे फुटेज, अल-कायदाचा माजी प्रमुख अयमान अल-जवाहिरी याचे छायाचित्र तसेच २००९ मध्ये सात सीआयए कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या आत्मघाती हल्लेखोराचा फोटो असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ओमान एअरमध्ये फ्लाइट ट्रेनिंग घेण्यापूर्वी अल हमामीला प्रशिक्षणातून हटवण्यात आले होते. त्याच्यावर कट्टरतावादी विचारसरणीचा आरोप करण्यात आला होता आणि त्याच्या विचारसरणीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगितले जाते. मात्र, अवघ्या ८ महिन्यांनंतर त्याला पुन्हा विमान कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर त्याने फ्लाय दुबईच्या विमानाला क्रॅश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. काही वृत्तांमध्ये त्याचा उद्देश तेल अवीवमधील इमारतींवर विमान आदळवण्याचा असल्याचाही दावा करण्यात आला आहे.