मुंबई
avinash mishra टीव्ही अभिनेता अविनाश मिश्रा याने ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. अंतिम फेरीतील आव्हानात्मक टास्कमध्ये त्याने ऋत्विक धनजानीला मागे टाकत विजेतेपद पटकावले. या विजयासोबत अविनाशला २० लाख रुपयांचे बक्षीस, एक नवी कार आणि बाईकही मिळाली. विशेष म्हणजे, अविनाशचा हा विजय त्याच्यासाठी भावनिक क्षण ठरला. त्याची मैत्रीण ईशा सिंह फिनालेमध्ये उपस्थित होती. अविनाशच्या हातात ट्रॉफी येताच ईशाच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.
विजयानंतर अविनाशने ईशाला मिठी मारली. विजेतेपद मिळाल्यानंतर अविनाशही भावुक झाला. मागील दोन वर्षांपासून तो प्रत्येक वेळी एक-दोन क्रमांकांनी विजयापासून दूर राहिला होता. मात्र, इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याच्या हातात ट्रॉफी आली, अशी भावना त्याने व्यक्त केली. त्यानंतर तो मंचावरून खाली आला आणि त्याने ईशाला मिठी मारली.
ईशानेही अविनाशच्या विजयाचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर अविनाशसोबतचा फोटो शेअर करत त्याचे अभिनंदन केले. ‘कदाचित देवाची योजना खरोखरच काहीतरी मोठी होती. ‘केकेके १५’चा विजेता अविनाश असल्याचा मला खूप अभिमान आहे. मी सध्या रडत आहे,’ अशा आशयाची प्रतिक्रिया ईशाने दिली.विजयानंतर अविनाशने आपल्या प्रवासाबद्दलही मनमोकळेपणाने सांगितले. ‘खतरों के खिलाड़ी’मध्ये सहभागी होण्यामागे स्वतःला काहीतरी सिद्ध करण्याचा उद्देश होता; मात्र या प्रवासात त्याने इतरांपेक्षा स्वतःलाच सिद्ध केल्याचे त्याने सांगितले. टेलिव्हिजन आणि मोठ्या पडद्यावर काम करताना आपली ‘हँडसम मुलगा’ अशी प्रतिमा निर्माण झाली होती. या प्रतिमेचा आनंद घेत असतानाच प्रेक्षकांनी आपल्यातील आणखी पैलू पाहावेत, अशी त्याची इच्छा होती. या शोने त्याला केवळ आपल्या कामगिरीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली, असे अविनाशने नमूद केले.
हा संपूर्ण प्रवास avinash mishra प्रामुख्याने मानसिक ताकदीची परीक्षा घेणारा होता, असेही त्याने सांगितले. शारीरिक तयारी करता येते; मात्र भीतीदायक आव्हानासमोर उभे राहिल्यावर कोणताही दिखावा उपयोगी पडत नाही. त्या क्षणी व्यक्ती, तिची भीती आणि घेतलेला निर्णय एवढेच महत्त्वाचे असते, असे अविनाशने म्हटले. बाहेरचा दबाव दुर्लक्षित करून स्वतःवर विश्वास ठेवत पुढे जाणे त्याने या प्रवासातून शिकल्याचेही सांगितले. काही प्रसंगी त्याने स्वतःलाही आश्चर्यचकित केले आणि ते क्षण कायम स्मरणात राहतील, असे त्याने स्पष्ट केले. शोमध्ये स्वतःची परीक्षा घेण्यासाठी आलो होतो; आता पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वास घेऊन बाहेर पडत असल्याचे अविनाशने सांगितले. त्याच्यासाठी हाच या विजयाचा सर्वांत मोठा अर्थ आहे.दरम्यान, अविनाश आणि ईशा सिंह यांच्या नात्याबाबतच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अविनाशने ईशासोबतच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या बॉन्डबाबत भाष्य केले. दोघे प्रेमसंबंधात असल्याच्या अफवा त्याने फेटाळल्या. त्यानंतर दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चांनाही सुरुवात झाली होती. या चर्चांवरही अविनाशने स्पष्टीकरण दिले. एका म्युझिक व्हिडीओच्या प्रमोशनदरम्यान दोघे दिसले होते आणि तो विवाहगीत असल्याने त्यात मेहंदी, संगीत तसेच फेऱ्यांसारखे विवाहविधी दाखवण्यात आले होते, असे त्याने सांगितले. त्यामुळे त्या व्हिडीओतील दृश्यांमुळे साखरपुड्याच्या अफवा पसरल्याचे त्याच्या स्पष्टीकरणावरून स्पष्ट झाले.