शेतकरी आत्महत्येची जबाबदारी बँकांवर!

बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
मुंबई,
Banks responsible for farmers' suicides! राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला असताना बँका, पतसंस्था किंवा वित्तसंस्थांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांना फोन करून अथवा तगादा लावून त्रास देऊ नये, असा स्पष्ट इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. कर्जवसुलीच्या दबावामुळे एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर संबंधित बँक, पतसंस्था तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणेला थेट जबाबदार धरले जाईल, असा इशारा त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिला. बावनकुळे यांनी जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यावर ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीत पीक कर्जवसुलीला स्थगिती देण्यात आली असून, या काळात कोणत्याही बँक किंवा पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांच्या दारात वसुलीसाठी जाऊ नये. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनीही याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
 

s3547 
 
 
दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्राचे पथक, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) तसेच दुष्काळ निवारण समिती आणि मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून मदतीचे नियोजन केले जात आहे. शेतकऱ्यांना यंदा दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत देण्याचा सरकारचा जोरदार प्रयत्न असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अत्यंत अचूकपणे करण्याचे सक्त निर्देशही बावनकुळे यांनी दिले आहेत. शेतातील पीक काढून घेतलेले असले तरीही प्रत्यक्ष परिस्थितीची सखोल पडताळणी करूनच पंचनामे पूर्ण करण्याची भूमिका त्यांनी मांडली. केंद्राकडून वेळेवर मदत मिळविण्यासाठी नुकसानीचे योग्य दस्तऐवजीकरण असणे अत्यंत आवश्यक असल्याने, या पंचनाम्याच्या प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ देऊ नये, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
 
 
दुसरीकडे, शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याबाबत वारंवार सूचना देऊनही सकारात्मक प्रतिसाद न देणाऱ्या व्यावसायिक बँकांसंदर्भातही बावनकुळे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. शासनाची विविध खाती ज्या बँकांमध्ये जमा आहेत, त्या बँकांनी अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना कर्ज देण्यास पूर्ण सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाचे आदेश देऊनही वेळेवर कर्जवाटप न करणाऱ्या अशा बँकांमधील सर्व सरकारी खाती तत्काळ काढून इतरत्र वळवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. संबंधित सर्व बँकांनी येत्या पंधरा दिवसांच्या आत पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे सक्त निर्देशही बावनकुळे यांनी दिले असल्याचे समजते.