बुलढाणा,
buldana-urban-40-years-special-coverबुलडाणा अर्बनच्या ४० वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या गौरवार्थ भारतीय डाक विभागाच्या वतीने विशेष टपाल आवरणाचे अनावरण करण्यात आले. बुलडाणा अर्बन येथील गोवर्धन हॉलमध्ये दि. ३ ऑक्टोबर झालेल्या या सोहळ्याला बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, उपाध्यक्ष विनोद केडिया, संचालक गोपाल चिरानिया, नागपूर क्षेत्राचे सहाय्यक निदेशक डाक सेवा जयंत दाऊ, बुलडाणा विभागाचे अधीक्षक डाकघर गजेंद्र जाधव यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय डाक विभागाच्या फिलाटेली परंपरेत विशेष टपाल आवरणाला महत्त्वाचे स्थान आहे. महत्त्वपूर्ण व्यक्ती, संस्था अथवा विशेष प्रसंगाच्या स्मृती जतन करण्यासाठी विशेष टपाल आवरण जारी केले जाते. बुलडाणा अर्बनच्या ४० वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने जारी करण्यात आलेले हे आवरण संस्थेच्या ऐतिहासिक प्रवासासह संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या योगदानाची नोंद करणारे ठरणार आहे. यावेळी भारतीय डाक विभागाच्या वतीने बुलडाणा अर्बनच्या चार दशकांच्या यशस्वी वाटचालीचे अभिनंदन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी, ग्राहकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि विश्वास या मूल्यांच्या आधारावर संस्थेने निर्माण केलेली स्वतंत्र ओळख उल्लेखनीय असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.