वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

मोहर्ली वनपरिक्षेत्रातील घटना

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
चंद्रपूर,
chandrapur-tiger-attackशेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला चढवून ठार केले. ही घटना मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी बिटात सोमवार, 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली. मंदा सूर्यभान मंगाम (60, रा. आगरझरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
 

halla 
 
मंदा मंगाम या सोमवारी दुपारच्या सुमारस मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी बिटातील राखीव वन कक्ष क्रमांक 187 लगत असलेल्या स्वतःच्या सर्व्हे क्रमांक 10/4 मधील शेतात काम करीत होत्या. यावेळी वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच मोहर्ली प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, दुर्गापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेगावकर व त्यांची चमू तसेच क्षेत्रीय वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनाकरिता चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे नेण्यात आला.
 
 
वनविभागाने मृत महिलेचे पती सूर्यभान मंगाम यांना 50 हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत दिली. वनविभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅप लावला असून, आगरझरी येथील गावकर्‍यांना सतर्क राहून कामे करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी थिपे करीत आहेत.