संतप्त नागरिकांनी भदाडी नदीवर रोखली वाहतूक

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
देवळी,
deoli road protest दोन वर्षांपासून रखडलेल्या दहेगाव-देवळी-वायगाव-कोसुर्ला मार्गाच्या कामाविरोधात अखेर नागरिकांचा संयम सुटला. सोमवार ५ रोजी जामणी येथील भदाडी नदीच्या पुलावर परिसरातील नऊ गावातील नागरिकांनी रास्ता रोको करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. अर्धवट पूल, खोदलेले रस्ते आणि रखडलेल्या बांधकामामुळे वाहनचालक व गावाकर्‍यांना दररोज होणार्‍या त्रासाचा उद्रेक या आंदोलनातून झाला.
 

deoli road protest 
सदर मार्गासाठी २३७ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर असून ७ ऑटोबर २०२४ रोजी कामाला सुरुवात झाली. बांधकामाची निर्धारित मुदत ७ ऑटोबर २०२६ रोजी संपत आहे. मात्र, कंत्राटदाराला पुढील मुदतवाढ किती कालावधीची देण्यात आली आहे, याबाबत स्पष्ट माहिती नाही. भदाडी पुलाचे अर्धवट काम डोकेदुखी ठरत आहे. या पुलाचे बांधकाम अर्धवट राहिल्याने पावसाळ्यात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रस्ता खोदून माती-मुरूम टाकण्यात आल्यानंतर काम बंद पडल्याने वाहनांना खराब मार्गावरून वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढला. प्रकल्पाचे कंत्राट आर. एम. एन. इन कंपनी, हैदराबाद यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत ७१ कोटी ७२ लाख रुपयांची उचलही झाली. एवढा मोठा निधी खर्च होऊनही प्रत्यक्ष काम मात्र संथगतीने होत असल्याने बांधकामाची गुणवत्ता, प्रगती आणि देखरेख याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच आमदार राजेश बकाने, तहसीलदार समर्थ क्षीरसागर, सा. बां. विभागाचे अभियंता मुत्तलवार, अभियंता महेश मोकलकर, ठाणेदार संदीप कापडे व इतर अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. अधिकार्‍यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आमदार बकाने यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. चर्चेनंतर सा. बां. विभागाने येत्या सात दिवसात काम सुरू करून पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले.आंदोलनामुळे काही वेळ बसेस व इतर वाहने माघारी फिरवावी लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मात्र, रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी केला. आंदोलनात भाविक आखूड, गौरव गावंडे, नंदकिशोर बिजवार, दिलीप परचाके, लता पुनसे, निशिगंधा पुनसे, मंदा गौरदिपे, फुलचंद बोरकर, आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.