धक्कादायक...रशियात प्लेग पसरल्याची भीती!

शंकेमुळे २०० हून अधिक कर्मचारी विलगीकरणात

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
मॉस्को,
रशियाच्या सायबेरिया भागात एका अँटी-प्लेग संशोधन संस्थेमधील प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर प्लेग पसरल्याची मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी वृत्तसंस्था 'टास'च्या अहवालानुसार, ही घटना इर्कुत्स्क जवळील शेलेखोव येथील अँटी-प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये घडली आहे. रशियाची संघीय आरोग्य देखरेख एजन्सी 'रोस्पोट्रेबनादझोर'ने सांगितले आहे की, मृत कर्मचाऱ्याला अज्ञात कारणांमुळे निमोनिया झाला होता. प्लेगच्या शक्यतेमुळे प्रयोगशाळेत काम करणाऱ्या सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांना विलगीकरणात म्हणजेच क्वारंटाइन करण्यात आले आहे.
 
 
Fear of plague outbreak in Russia
 
असे सांगितले जात आहे की, प्रयोगशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला निमोनिया झाला होता आणि निमोनियाचा प्रभाव सतत वाढल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, इर्कुत्स्क जवळील शेलेखोव येथील ही अँटी-प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूट जगातील अत्यंत जीवघेण्या आणि संसर्गजन्य रोगांवर संशोधन करून माहिती गोळा करण्याचे काम करते. रशियन एजन्सीने स्पष्ट केले आहे की मृत कर्मचाऱ्याला अज्ञात कारणाचा निमोनिया झाला असला तरी सध्या इर्कुत्स्क, इर्कुत्स्क शहर आणि शेलेखोव येथील आरोग्याची स्थिती पूर्णपणे स्थिर आहे.या घटनेनंतर स्थानिक अँटी-एपिडेमिक परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली. इर्कुत्स्कचे गव्हर्नर इगोर कोबजेव यांनी नागरिकांना कोणत्याही अफवा किंवा भीतीपोटी धास्तावून न जाण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. क्षेत्रातील एका रहिवाशात अतिशय धोकादायक संसर्गाचा संशयित प्रकार समोर आल्यानंतर ही बैठक बोलावली गेल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी आश्वासनांनंतरही या मृत्यून्यूमोनिक प्लेगच्या संभाव्य प्रकरणाविषयीची चिंता वाढवली आहे.
 
शेलेखोवच्या आसपासच्या परिसरातही खबरदारीचे उपाय म्हणून पावले उचलण्यात आली आहेत. संशोधन केंद्राजवळ असलेल्या एका औद्योगिक आशियाई अल्युमिनियम सुविधेने कर्मचाऱ्यांना तोंडावर मास्क किंवा फेस कव्हर वापरण्याचे निर्देश दिले आहेत. इर्कुत्स्क अल्युमिनियम प्लांटचे प्रमुख आर्तेंम फोमिनिख यांनी चालू असलेल्या चर्चांच्या दरम्यान नागरिकांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्पष्ट केले की सध्या अनेक प्रकारच्या अफवा आणि वेगवेगळ्या बातम्या पसरत आहेत. यादरम्यान लोकांमध्ये लॉकडाऊनची भीती देखील वाढू लागली आहे, तर दुसरीकडे रशियन अधिकारी सार्वजनिक आरोग्याची स्थिती स्थिर असल्याचा दावा वारंवार करत आहेत. 'रोस्पोट्रेबनादझोर'चे नेतृत्व करणारे गेनाडी ओनिशचेंको यांनी अशी शंका व्यक्त केली की सायबेरियन पॅथोजन कदाचित प्लेग नसावा आणि पुढे असेही म्हटले की, जर प्लेगची पुष्टी झाली तरीदेखील हा आजार पसरणार नाही. ज्या लोकांच्या संपर्कात हे व्यक्ती आले होते, ते सर्व सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. सध्यातरी त्यांच्यामध्ये या आजाराचे कोणतेही लक्षण दिसून आले नाही आणि त्यांच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, प्लेग हा 'येर्सिनिया पेस्टिस' नावाच्या जिवाणूमुळे होणारा आजार आहे. याचा एक प्रकार न्यूमोनिक प्लेग हा आहे, जो श्वसनसंस्थेला प्रभावित करतो आणि संक्रमित व्यक्तीच्या श्वासाद्वारे किंवा खोकताना उडणाऱ्या थेंबाद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. तीव्र ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे आणि खोकला ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.