गोंदियात आगीचे तांडव डेअरी स्वीट मार्ट जळून खाक

लाखोंचे नुकसान; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
gondia fire शहराच्या मध्यवर्ती भागातील श्यामसुंदर डेअरी स्वीट मार्टला सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दुकानातील साहित्य व खाद्यपदार्थ जळून खाक झाला असून, दुकानमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 

gondia fire shyamsundar dairy sweet mart gutted, loss worth lakhs 
पहाटेच्या सुमारास दुकानातून धूर व आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसून आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रिण मिळवले. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने काही वेळातच संपूर्ण दुकान जळून खाक झाली. दुकानातील विविध साहित्य, खाद्यपदार्थ व इतर वस्तू जळून मोठे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. दरम्यान, अग्निशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आग आणखी भडकली असती तर दुकानालगत असलेल्या इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांनाही त्याची झळ बसण्याची शक्यता होती. घटनेनंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेचा पुढील तपास सुरू आहे