गोंदियात ऑक्टोबर हिटचा तडाखा ; पारा ३३.८ अंशांवर

दिवसभर कडक उन्हाची तीव्रता; मध्यरात्रीनंतर गारवा

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
october heatwave पावसाने विश्रांती घेताच गोंदिया जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने वातावरणात बदल झाला असून, सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचे कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे दिवसा कडक उन्हाचा चटका जाणवत असून, रात्री उशिरा आणि मध्यरात्रीनंतर वातावरणात काहीसा गारवा अनुभवास येत आहे.
 

gondia october heatwave: temperature rises to 33.8 degrees celsius 
पावसाळ्याच्या दिवसांत ढगाळ वातावरण आणि अधूनमधून होणार्‍या पावसामुळे तापमानात चढ-उतार होत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेताच सूर्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचा प्रभाव जाणवत असून, दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक वाढत आहे. परिणामी नागरिकांना ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर हा पावसाचा कालावधी राहत असून त्यानंतर परतीचा पाऊस होत असतानाच हिवाळ्याच्या थंडीला सुरुवात होते. मात्र, यंदा हिवाळ्याच्या सुरुवातीलाच गोंदियाकरांना उन्हाळ्याच्या चटक्यांच्या सामना करावा लागत आहे. मध्यरात्रीनंतर वातावरणात थोडाफार गारवा जाणवत असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असला तरी सकाळ होताच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दिवसा वाढलेले तापमान आणि रात्रीचा गारवा यामुळे तापमानातील तफावत वाढत असून याचा परिणामी नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक उन्हात जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
कोट...
सद्या मानसून कालावधी संपलेला आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधी पावसाची नोंद केली जाते. यंदा निश्चितच शेवटच्या आठवड्यात पावसाचा मोठा खंड पडलेला आहे. त्यामुळे दमट वातावरणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सद्या दिवसा उन्हाचे चटके बसत असताना रात्रीच्या सुमारास वातावरणात बदल होत असून नागरिकांनी काळजी घ्यावी.
- राजन चौबे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, गोंदिया