बल्लभगढमध्ये 2496 किलो स्फोटक साहित्य जप्त

हाथरस कनेक्शनने खळबळ

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
फरीदाबाद.
Hathras connection causes a stir. फरीदाबादमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत बल्लभगढच्या मुकेश कॉलनीतील एका खोलीतून तब्बल 2496 किलो स्फोटक स्वरूपाचे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये सुमारे 200 किलो गंधक आणि 2296 किलो पोटॅशियम नायट्रेटचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा परिसर रहिवासी भागात येत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.क्राइम ब्रांच सेक्टर-30ला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात पुनीत नावाच्या व्यक्तीला अटक केली असून तो मुकेश कॉलनी, बल्लभगढ येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. चौकशीनंतर पोलिसांचे पथक त्याला संबंधित खोलीपर्यंत घेऊन गेले. तेथे झडती घेतल्यानंतर 200 किलो गंधक आणि 2296 किलो पोटॅशियम नायट्रेट आढळून आले.
 
 
t57
 
 
प्राथमिक चौकशीत पुनीतने हे साहित्य उत्तर प्रदेशातील हाथरस येथून आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा संबंध हाथरसशी जोडला जात असून, या साहित्याचा पुरवठा नेमका कोण करत होते आणि ते पुढे कोणाला देण्यात येणार होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, गंधक आणि पोटॅशियम नायट्रेटचा वापर फटाके तयार करण्यासाठी केला जातो. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात हे साहित्य एका खोलीत साठवून ठेवण्यात आल्याने त्यामागील उद्देश तपासण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सध्या जप्त करण्यात आलेले साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 
यापूर्वीही फरीदाबादमधील धौज आणि फतेहपूर तगा परिसरातून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 2923 किलो स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यावेळी धौज येथील अल-फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित कथित दहशतवादी नेटवर्क उघडकीस आले होते. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचाही उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, मुकेश कॉलनीसारख्या रहिवासी भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटक स्वरूपाचे साहित्य आढळल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या साहित्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बनवण्यासाठी अशा साहित्याचा साठा केला जात आहे का, यासह त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता पोलिस करत आहेत.