अनिल कांबळे
नागपूर,
husband murder case अनैतिक संबंधातून पतीची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या २९ वर्षीय महिलेला बेलतरोडी पोलिसांनी ठाणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने अटक केली. दीपाली ऊर्फ बाली विजय साळुंखे असे अटकेतील महिलेचे नाव आहे. गुन्ह्यानंतर ती आपली ओळख लपवून ठाण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
दीपालीविरुद्ध बेलतरोडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती. दरम्यान ती ठाण्यातील संत ज्ञानेश्वरनगर परिसरात लपून राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ठाणे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकून तिला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीदरम्यान दीपालीने गुन्ह्यातील सहभागाबाबत तोंडी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तिला पुढील कायदेशीर कारवाईसाठी बेलतरोडी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. पोलिस तिची कसून चौकशी करीत आहेत.