इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानात पुन्हा आंदोलन

पीटीआयचा इस्लामाबादकडे लाँग मार्च

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
इस्लामाबाद
imran khan पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी पाकिस्तानात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झाले आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने खैबर पख्तूनख्वातून इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्च सुरू केला आहे. सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, इस्लामाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून, शहरात कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या आंदोलनामुळे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्यासमोरील आव्हान वाढले असून, पीटीआयचा मोर्चा इस्लामाबादपर्यंत पोहोचतो की सरकार त्याला मार्गातच रोखते, याकडे लक्ष लागले आहे.
 

imran khan release protest: pti launches long march towards islamabad 
पीटीआय आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. चर्चेची दुसरी फेरी शनिवारी सायंकाळी चार वाजता सुरू झाली आणि ती रात्रभर चालली. मात्र, रविवारी पहाटे ही चर्चा कोणत्याही ठोस सहमतीविना संपली. त्यानंतर पीटीआयने आंदोलनाचा मार्ग स्वीकारत इस्लामाबादकडे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
पीटीआय समर्थकांनी खैबर पख्तूनख्वातील लक्की मारवत येथून लाँग मार्चला सुरुवात केली. ४ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते गांडी चौक येथे जमले आणि तेथून ते मोर्चात सहभागी झाले. सुमारे २७५ किलोमीटर अंतर कापत हजारो आंदोलक इस्लामाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, पीटीआय कार्यकर्त्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून, पक्षाच्या दाव्यानुसार सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबादमधील संसद परिसर आणि महामार्गांची सुरक्षा वाढविण्यात आली असून, अनेक मार्ग कंटेनर लावून बंद करण्यात आले आहेत.
पीटीआयने यापूर्वी २७ सप्टेंबर रोजी इस्लामाबादपर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, शहबाज शरीफ सरकारने आंदोलन रोखण्यासाठी कठोर पावले उचलल्यानंतर हा मोर्चा ४ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला. आंदोलनामुळे पाकिस्तान सरकारवर अतिरिक्त आर्थिक भारही पडल्याचे सांगण्यात येत आहे. पीटीआयच्या प्रमुख मागण्यांमध्ये तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांची भेट पक्षाच्या नेत्यांना घेता यावी, तसेच त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी खासगी डॉक्टरांना परवानगी देण्यात यावी, यांचा समावेश आहे.
पीटीआयने मोर्चासाठी पुढीलimran khan  मार्ग आणि मुक्कामाचे नियोजन केले आहे. ४ ऑक्टोबरच्या रात्री मोर्चा करकजवळ थांबणार आहे. ५ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता करक येथून पुढील प्रवास सुरू करून रात्री कोहाटजवळ मुक्काम केला जाणार आहे. ६ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता कोहाट, हंगू, कुर्रम आणि ओरकजई येथील आंदोलक मोर्चात सहभागी होतील. त्यानंतर मोर्चा पेशावरच्या दिशेने रवाना होऊन मत्तानीजवळ रात्रीचा मुक्काम करणार आहे.
७ ऑक्टोबरला दुपारी पेशावरमधील बुध बैर येथून मोर्चा पुढे निघेल. पेशावरच्या इतर भागांतील आंदोलक कोहाट रोड ब्रिज आणि मोटरवे टोल प्लाझा येथे मोर्चात सहभागी होतील. त्यानंतर रात्री चरसद्दा इंटरचेंजजवळ मुक्काम केला जाणार आहे. ८ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता चरसद्दा आणि मोहम्मद भागातील आंदोलक मोर्चात सहभागी होणार आहेत.
७३ वर्षीय इम्रान खान हे माजी क्रिकेटपटू असून २०२३ पासून तुरुंगात आहेत. भ्रष्टाचार आणि हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपांसह त्यांच्याविरोधात शंभरहून अधिक प्रकरणे दाखल आहेत. सध्या ते रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात बंद आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर, विशेषतः डोळ्यांच्या दृष्टीशी संबंधित समस्येमुळे, १८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने तपासणी आणि उपचारांसाठी त्यांना इस्लामाबादमधील खासगी रुग्णालयात हलविण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारने या आदेशाला आव्हान दिले आणि त्यानंतर पुनर्विचार याचिकाही दाखल केली.