गो-विज्ञान अनुसंधान केंद्रात बुधवारी पाच प्रकल्पांचे लोकार्पण ,

प. पू . सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची उपस्थिती

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |


नागपूर

dr-mohanji-bhagwat श्रद्धेय अशोकजी सिंघल जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी गो-विज्ञान अनुसंधान केंद्र, गोतीर्थ, देवलापार येथे ५ नवीन प्रकल्पांचा शुभारंभ व लोकार्पण समारंभ बुधवारी ७ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. श्रद्धेय अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा हा शुभारंभ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बुधवारी ७ ऑक्टोबरला सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत आयोजित या कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. माया इवनाते, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आलोक कुमार, केंद्रीय गो-रक्षा प्रमुख दिनेशचंद्र, महाराष्ट्र राज्य गो-सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंधडा उपस्थित राहतील.

 
mohanji
गोतीर्थ, देवलापार येथे ऑर्गेनिक मॅन्युअर युनिटचे लोकार्पण, देशी गोवंशाच्या प्रजाती गुणवत्तेच्या सुधारणेसाठी आयव्हीएफ युनिट, रामदेवबाबा युनिव्हर्सिटी, नागपूरच्या सहकार्याने निर्मित गो-आधारित बैलचलित विद्युत निर्मिती युनिट, ग्रामीण कारागीर व रोजगाराला प्रोत्साहनपर राणी दुर्गावती ग्रामीण हाटचे लोकार्पण होणार आहे. ऑर्गेनिक मॅन्युअर युनिटच्या माध्यमातून गो-आधारित सेंद्रिय खताच्या उत्पादनाला चालना मिळणार असून, नैसर्गिक व शाश्वत शेतीसाठी उपयुक्त पर्याय उपलब्ध होणार आहे. आयव्हीएफ युनिटच्या माध्यमातून उच्च गुणवत्तेच्या देशी गोवंशाची प्रजाती सुधारणा व संवर्धन वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
 

रामदेवबाबा युनिव्हर्सिटी, नागपूरच्या सहकार्याने निर्मित बैलचलित विद्युत निर्मिती युनिट हे पारंपरिक गो-आधारित व्यवस्थेचा आधुनिक तंत्रज्ञानाशी समन्वय साधणारे अभिनव उदाहरण आहे. राणी दुर्गावती ग्रामीण हाटच्या माध्यमातून ग्रामीण कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबतच स्थानिक स्तरावर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.