विद्यार्थ्यांंचे अर्धे टक्कल केल्याने पालकांचा संताप

जांभूळघाट आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
चिमूर, 
incident in Chandrapur चिमूर तालुक्यातील नेरी जवळील जांभूळघाट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचे केस कापताना अर्धे टक्कल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्रमशाळेतील अधीक्षक प्रशांत आत्राम यांनी याबाबत घेतलेल्या अजब भूमिकेमुळे आणि विद्यार्थ्याचे अशाप्रकारे केस कापल्याने पालक व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्याच्या संमतीशिवाय किंवा कोणत्याही कारणास्तव त्याचे अर्धे टक्कल करण्यात आले हे योग्य नसून, अशा प्रकारे सार्वजनिकरित्या अपमानित करण्यात का आले, तसेच संबंधित अधीक्षकांनी कोणत्या अधिकारातून ही कारवाई केली, याची चौकशी व्हावी, अशी मागणी आता होत आहे. 
 
 
incident in Chandrapur
 
 
तसेच आश्रमशाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या सन्मानाचीही जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने चौकशी करून दोषी आढळणार्‍यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित आश्रमशाळा प्रशासन व आदिवासी विकास विभागाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. या संदर्भात पालक गजानन चौधरी यांनी, दारूच्या नशेत असलेल्या अधीक्षकाने माझ्या मुलाचीही अर्धटक्कल करून चेहरा विद्रुप केला. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, विद्यार्थ्यांना झालेल्या या त्रासाला जबाबदार असलेल्या अधीक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
 
 
 
अधीक्षकाला नोटीस बजावली आहे : मुध्याध्यापक गिरी
मी महत्वाच्या कामानिमित्त एका तासासाठी चिमुरला गेलो होतो. परत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. संबंधित अधीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया जांभूळघाट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गिरी यांनी दिली.
 
  
 
कटींग करताना स्टिमरची चार्जिंग संपली : प्रशांत आत्राम
मुले आंघोळ करताना केस धुत नाहीत. अशावेळी गर्मीमध्ये खेळताना डॅन्डरप, फुटकळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांची बारीक कटींग करण्याचा मी निर्णय घेतला. त्यानुसार कटींग करताना मुले इकडे-तिकडे भटकू नये म्हणून सुरवातील सर्व मुलांचे स्टिमरने अर्धे केस कापले. 10 ते 15 विद्यार्थ्यांची कटींग झाल्यानंतर स्टिमरची चार्जींग संपल्याने न्हाव्याने उर्वरित विद्यार्थ्यांची कटींग उद्या करून असे सांगितले. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी सर्व मुलांची कटींग करून केस समांतर करण्यात येणार होते. मात्र, अर्धवट कटींग झाल्याच्या अवस्थेत काही मुलांचे फोटो व्हायरल झाले. यामागे माझा कुठलाही वाईट हेतू नव्हता, अशी प्रतिक्रिया जांभूळघाट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे अधीक्षक प्रशांत आत्राम यांनी दिली.