मुंबई
janhvi killekar मालिका आणि चित्रपटांमधील अभिनयातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आता एका वेगळ्या आणि रंजक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी ‘मिरांडा वॉर्निंग’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत असून, हा चित्रपट २७ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज यांच्या माध्यमातून ‘मिरांडा वॉर्निंग’ची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रचे कल्पक जोशी यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सचिन धोत्रे यांनी यापूर्वी २०२३ मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर ‘मिरांडा वॉर्निंग’च्या माध्यमातून त्यांनी सस्पेन्स-थ्रिलरच्या धाटणीचा वेगळा प्रयोग केला आहे. रवींद्र मठाधिकारी आणि सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे.
‘हेरिटेजवाडी’ नावाच्या फार्महाऊसवर खुनाची घटना घडते आणि त्यानंतर या घटनेमागचे गूढ उकलण्याचा थरारक प्रवास सुरू होतो. या तपासादरम्यान समोर येणाऱ्या घटनांची गुंतागुंतीची मालिका चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे एका रफटफ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, त्याच्या भूमिकेमुळे चित्रपटाच्या कथानकाला वेगळी धार मिळणार आहे.मराठी चित्रपटसृष्टीत यापूर्वीही सस्पेन्स आणि थ्रिलर प्रकारातील अनेक चित्रपट आले आहेत. मात्र, दमदार कथानक, अनुभवी कलाकार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम मांडणीच्या माध्यमातून ‘मिरांडा वॉर्निंग’ हा चित्रपट या प्रकारात वेगळा ठरण्याचा प्रयत्न करत आहे.भाग्य दिले तू मला’ या मालिकेसह ‘सायको रंगा’सारख्या चित्रपटातून जान्हवी किल्लेकरने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधील सहभागामुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. आता ‘मिरांडा वॉर्निंग’च्या माध्यमातून ती पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून आपली वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
सस्पेन्स थ्रिलरच्या कथानकात जान्हवीची नेमकी भूमिका काय आहे, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तिच्या व्यक्तिरेखेबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. फार्महाऊसवरील खून, त्यानंतर सुरू होणारा तपास आणि त्यातून उलगडत जाणारे रहस्य यांची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २७ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.