वर्धा,
karanja-child-marriage-stoppedकारंजा तालुक्यातील एका गावात होणारा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे थांबविण्यात यश आले. ३ ऑक्टोबर रोजीच्या या कामगिरीत चाईल्ड हेल्पलाईनची भूमिका महत्त्वाची ठरली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिवणी जिल्ह्यातील धारणा येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह कारंजा (घा.) तालुक्यातील २४ वर्षीय युवकाशी ठरला. या बालविवाहाची प्राथमिक माहिती महिला व बालविकास विभागाच्या चाईल्ड हेल्पलाईनच्या टोल-फ्री क्रमांकावर एका कॉलरद्वारे मिळाली. माहिती मिळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक पथकाचे पोलिस कर्मचारी नवनाथ मुंडे यांना माहिती दिली. तातडीने समन्वय साधून घटनास्थळाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी यांच्या मार्गदर्शनात संयुक्त पथक घटनास्थळी पोहोचले. दोन्ही कुटुंबीयांचे समुपदेशन केल्यावर बालविवाह थांबवण्यात यश आले.
तिला बाल कल्याण समिती, वर्धा येथे हजर करण्याचे निर्देश पालकांना दिले. पुढील कायदेशीर व पुनर्वसनाची कार्यवाही बाल कल्याण समितीमार्फत केली जाणार आहे. ही कारवाई विस्तार अधिकारी साहेबराव खंडार, सारवाडीच्या सरपंच संगीता गोहते, पोलिस उपनिरीक्षक मनोज शेंडे, संरक्षण अधिकारी नितीन जुगनाके, रामेश्वर राठोड, अंगणवाडी सेविका तथा सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी निर्मला चोपडे, पोलिस पाटील प्रथमेश बिरगेड, चाईल्ड हेल्पलाईनच्या जयश्री निवल, पुरुषोत्तम कांबळे, संतोष डोणे व वैभव भांदककर यांनी केली.
आपल्या पाल्याचा बालविवाह करून त्यांचे भविष्य धोक्यात आणू नका. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. मुलांच्या आरोग्यावर व शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम होतो. कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांनी केले आहे.