मुंबई
neetu kapoor सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असतात. मात्र, अनेकदा सेलिब्रिटींच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या शरीराच्या खासगी भागांकडे लक्ष वेधणाऱ्या अँगलमधून घेतलेले फोटो चर्चेचा विषय ठरतात. अशा प्रकारच्या ‘बॅक शॉट’वर अभिनेता सलमान खानने नुकताच आक्षेप घेतल्यानंतर आता अभिनेत्री नीतू कपूर यांनीही पापाराझींना टोला लगावला आहे.
नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबईत त्यांना पापाराझींनी स्पॉट केले. व्हिडीओमध्ये नीतू कपूर आपल्या कारमध्ये बसताना दिसत आहेत. त्यावेळी पापाराझी त्यांचे फोटो काढत असताना त्यांच्यापैकी एक जण ‘मॅम, बॅक की टर्न...’ असे म्हणतो. त्यावर नीतू कपूर यांनी मिश्कील अंदाजात, ‘आपको ये बड़ा अच्छा लगता है ना बैक?’ असा सवाल केला आणि त्यानंतर त्या कारमध्ये बसल्या. या प्रसंगात त्या हसतानाही दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून, नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
बॅक शॉटवरून सुरू झालेल्या या चर्चेची पार्श्वभूमी सलमान खानच्या वक्तव्याशी जोडली जात आहे. ‘बिग बॉस २०’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानने सेलिब्रिटींच्या मागून अशा प्रकारे फोटो किंवा व्हिडीओ शूट करण्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्याने पापाराझींवरही टीका करत अशा प्रकारच्या शूटिंगवर प्रश्न उपस्थित केला होता. सलमानच्या या भूमिकेला सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला.
अभिनेत्री नेहा धूपियाने neetu kapoor यापूर्वी पापाराझींना याच मुद्द्यावरून जाहीरपणे सुनावले होते. सेलिब्रिटींचे मागून अशा प्रकारे शॉट घेणे बंद करावे, अशी भूमिका तिने मांडली होती. त्यानंतर ‘बिग बॉस २०’मध्ये सलमान खानने नेहा धूपियाच्या भूमिकेला पाठिंबा देत पापाराझींवर संताप व्यक्त केला. अशा प्रकारे कोणी शूट करत असेल, तर त्याला चापट मारावी, असे वक्तव्यही सलमानने केले होते.सलमान खानने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे मोठ्या प्रमाणात समर्थन झाले. ‘द वन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया ‘बिग बॉस २०’मध्ये आले होते. त्यावेळी तमन्नानेही सलमानच्या भूमिकेचे कौतुक केले होते.दरम्यान, सलमान खानने सेलिब्रिटींच्या एआय-निर्मित डीपफेक फोटो आणि व्हिडीओंबाबतही यापूर्वी नाराजी व्यक्त केली आहे. डीपफेकच्या वाढत्या प्रकाराविरोधात अनेक सेलिब्रिटींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे सेलिब्रिटींच्या खासगीपणाचा आदर, फोटो-व्हिडीओ काढण्याची पद्धत आणि सोशल मीडियावर त्यांचा वापर या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.