कोरोनानंतर जगात पुन्हा नव्या संसर्गाची भीती?

रशियातील लॅबमध्ये ‘त्या’ एका चुकीने महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
मॉस्को'
new infection worldwide जागतिक पातळीवर कोरोना महामारीचा धोका संपत आला असतानाच, आता रशियातून एका नव्या संसर्गजन्य आजाराची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सायबेरियातील इर्कुत्स्क प्लेग विरोधी संशोधन संस्थेत काम करणाऱ्या 27 वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा एका धोकादायक संसर्गाने मृत्यू झाला आहे. लॅबमध्ये चाचणीसाठी नमुने गोळा करत असताना जिवंत जिवाणू असलेली टेस्ट ट्यूब चुकून फुटल्यामुळे तिला हा आजार जडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तीव्र न्यूमोनियामुळे प्रकृती ढासळल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ पावले उचलत परिसर सील केला असून, तिच्या संपर्कात आलेल्या सुमारे 200 लोकांना सुरक्षेचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवले आहे.
 
new infection

रशियन आरोग्य यंत्रणेकडून तपासाला वेग
रशियन सरकारी यंत्रणा आणि वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, या संसर्गाचे नेमके स्वरूप अद्याप अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून हा ‘न्यूमोनिक प्लेग’ असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, तर रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी याला “अज्ञात कारणांमुळे झालेला अत्यंत धोकादायक संसर्ग” असे संबोधले आहे. न्यूमोनिक प्लेग हा ‘येरसिनिया पेस्टिस’ नावाच्या धोकादायक जिवाणूमुळे होतो आणि हा थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो. खोकण्यातून किंवा शिंकण्यातून हवेद्वारे हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अत्यंत वेगाने पसरू शकत असल्याने रशियामध्ये खबरदारीचे उपाय योजले जात आहेत.

तीव्र तापासह श्वासोच्छवासाचा त्रास
वैद्यकीय अहवालानुसार, या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये तीव्र ताप, सतत डोकेदुखी आणि शरीरात अचानक प्रचंड अशक्तपणा येणे यांचा समावेश होतो. संसर्ग वाढल्यानंतर वेगाने न्यूमोनिया जडणे, श्वास घेण्यास गंभीर अडथळा निर्माण होणे, छातीत तीव्र वेदना आणि खोकल्यावाटे रक्ताचे डाग पडणे ही धोकादायक लक्षणे दिसून येतात. रशियन आरोग्य तज्ज्ञांच्या मते या अपघातामुळे जागतिक स्तरावर व्यापक प्रादुर्भाव किंवा लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होण्याचा धोका कमी असला, तरी हवा आणि श्वसनाद्वारे पसरणाऱ्या या संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.