स्टॉकहोम,
Nobel Prize in Medicine announced सोमवारी वैद्यकीय क्षेत्राचा २०२६ चा नोबेल पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आला आहे. हे तीन्ही वैज्ञानिक मज्जासंस्थेवर काम करत असून, मेंदूतील वेगवेगळ्या मज्जातंतूंच्या (नर्व्ह सेल्स) हालचालींना प्रकाशझोताच्या मदतीने चालू किंवा बंद करण्याच्या पद्धतीवर संशोधन करत होते. हा प्रतिष्ठित पुरस्कार जर्मनीचे पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल तसेच अमेरिकेचे कार्ल डाइसेरोथ यांना संयुक्तपणे देण्यात आला आहे. या संशोधकांनी 'लाईट गेटेड आयन चॅनल' आणि 'ऑप्टोजेनेटिक्स' या विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन केले असून, ते जर्मनी आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये कार्यरत आहेत.

नोबेल समितीने त्यांच्या या कार्याची प्रशंसा करताना 'एक्स'वर लिहिले की, या पद्धतीचा वापर आता जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये मेंदूचे गूढ उलगडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. नोबेल समितीनुसार, या तिन्ही वैज्ञानिकांच्या या शोधामुळे मानवी मेंदूला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी संशोधनाचा एक पूर्णपणे नवीन मार्ग मोकळा झाला आहे. या नाविन्यपूर्ण संशोधनाचा उपयोग आता डोळ्यांच्या विविध आजारांवरही केला जात असून, वैज्ञानिकांमार्फत हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे की या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अंधत्व आलेल्या लोकांची दृष्टी पुन्हा परत आणता येऊ शकते का.
स्टॉकहोममधील 'करोलिन्स्का इन्स्टिट्यूट'मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली, ज्याच्या सोबतच यंदाच्या नोबेल वीक (नोबेल सप्ताह) ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोमवारी वैद्यकीय क्षेत्राचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्यातील नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जाईल. त्यानंतर शुक्रवारी शांतता पुरस्कार प्रदान केला जाईल आणि १२ ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्र विषयातील नोबेल मेमोरियल पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे.