पुणे
cyber fraud ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमधून मिळणारी रक्कम सुरक्षितपणे पुढे वळवण्यासाठी पुण्यातील तरुणांची बँक खाती वापरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा वानवडी पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, देशभरातील १९ नागरिकांची तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून मिळवलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम पुण्यातील काही तरुणांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाला मिळाली होती. अशा खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यातील रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वळवण्यासाठी केला जात असल्याने त्यांना ‘म्यूल अकाउंट’ म्हटले जाते. माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी तपास सुरू केला असता, देशातील वेगवेगळ्या भागांतील नागरिकांची फसवणूक करून लुटलेली रक्कम पुण्यातील काही बँक खात्यांमध्ये जमा होत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणाचा माग काढत पोलिसांनी संबंधित खात्यांचे व्यवहार आणि त्यामागील व्यक्तींची माहिती तपासली. त्यानंतर सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. श्रवण राजेंद्र अंकुशे (२५, रा. उरुळी देवाची), हरिओम हरिराम साहू (२४, रा. साळूंखे विहार, एनआयबीएम रस्ता), सौद इरफान शेख (२३, रा. येरवडा), साहिल रौफ शेख (२५, रा. येरवडा) आणि तालीब नूरमहम्मद शेख (२५, रा. मोहनवाडी, येरवडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या तपासात या टोळीने सायबर गुन्ह्यांतून मिळालेली रक्कम वळवण्यासाठी बनावट किंवा वापरासाठी उपलब्ध करून दिलेल्या बँक खात्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. या खात्यांच्या माध्यमातून देशभरातील १९ नागरिकांना गंडा घालण्यात आल्याचे आणि त्यांच्या फसवणुकीतून सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम वळवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अटक केलेल्या पाचही cyber fraud आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून, या टोळीने आणखी किती सायबर गुन्हेगारांना म्यूल अकाउंट्स उपलब्ध करून दिली, या खात्यांमधून किती रकमेचे व्यवहार झाले आणि या नेटवर्कमागे आणखी कोणते सूत्रधार आहेत, याचा तपास वानवडी पोलिसांकडून सुरू आहे.