‘लोकांना क्रिंज वाटत असेल तरी मी अशीच राहणार’

ट्रोलिंगवर रश्मिका मंदान्नाचं सडेतोड उत्तर

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
मुंबई
rashmika mandanna दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या आगामी ‘राणाबली’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रश्मिकाला तिच्या स्वभावावरून होणाऱ्या सोशल मीडिया ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला. तिच्या प्रेमळ आणि उत्साही वागण्याला काही जण ‘ओव्हरॲक्टिंग’ किंवा ‘क्रिंज’ म्हणतात. मात्र, या टीकेला रश्मिकाने शांतपणे पण ठाम शब्दांत उत्तर दिले.
 

rashmika mandanna hits back at trolls, says kindness is not a weakness 
चांगुलपणा ही आपली कमजोरी नसून ताकद आहे, असे रश्मिकाने स्पष्ट केले. आजूबाजूला आधीच मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आहे. त्यामुळे आपण आपल्या परीने सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे तिचे म्हणणे आहे. आपल्या प्रेमळ वागण्याला कोणी ‘ओव्हरॲक्टिंग’ म्हटले तरी त्याचा आपल्यावर फारसा परिणाम होत नाही, असेही तिने सांगितले.
प्रत्येक व्यक्तीला आपला स्वभाव आवडेलच असे नाही, याची रश्मिकाला जाणीव आहे. त्यामुळे काही लोकांना आपले वागणे पसंत नसेल, तर केवळ त्यांच्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची आपली इच्छा नाही, असे तिने स्पष्ट केले. आपण जसे आहोत तसेच राहण्यात आनंद असल्याचे सांगताना रश्मिकाने तिचे प्रेमळ वागणे ही केवळ चाहत्यांसमोरची प्रतिमा नसून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा भाग असल्याचेही नमूद केले.
इतरांना खूश करण्यासाठी स्वतःमध्ये कृत्रिम बदल करणे आपल्याला शक्य नाही, असेही रश्मिकाने सांगितले. आपल्या या स्वभावामुळे आपण स्वतः, आपले कुटुंब, मित्र आणि जवळचे लोक आनंदी असतील, तर आपल्यासाठी तेच सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे तिने स्पष्ट केले.
दरम्यान, रश्मिकाचा पती आणि अभिनेता विजय देवरकोंडा यानेही सोशल मीडिया ट्रोलिंगच्या मुद्द्यावर भाष्य केले. कलाकार किंवा प्रसिद्ध व्यक्तींबाबत सोशल मीडियावर अनेकदा विशिष्ट मत तयार केले जाते आणि त्याभोवती एक ठरावीक ‘नॅरेटिव्ह’ उभे केले जाते, असे विजयने म्हटले. एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटलेलेही नसताना तिच्या स्वभावाबद्दल ठाम मत कसे तयार केले जाऊ शकते, असा सवाल त्याने उपस्थित केला.
रश्मिका आणि विजय देवरकोंडा लवकरच ‘राणाबली’ या चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. लग्नानंतर दोघांचा हा पहिलाच एकत्र चित्रपट असणार आहे. राहुल संकृत्यायन दिग्दर्शित ‘राणाबली’ हा १९व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर आधारित पीरियड ॲक्शन ड्रामा आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
रश्मिका आणि विजय यापूर्वी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले आहेत. आता लग्नानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणाऱ्या या जोडीला पाहण्यासाठी चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.