ऐनवेळी साकोली-चंद्रपूर बस रद्द; प्रवाशांची तारांबळ

पूर्वसूचना न दिल्याने प्रवाशांचा संताप

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
साकोली,
st bus ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या एसटी महामंडळाच्या साकोली आगाराचा आजचा कारभार प्रवाशांसाठी मनस्तापदायी ठरला. सकाळी ८ वाजताची साकोली-चंद्रपूर बसफेरी ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने शेकडो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे बसफेरी रद्द झाल्याची कोणतीही पूर्वसूचना किंवा उद्घोषणा आगाराकडून करण्यात आली नाही.
 

sakoli-chandrapur st bus cancelled at last minute, passengers face inconvenience 
साकोली आगारातून दररोज सकाळी ८ वाजता साकोली-चंद्रपूर बसफेरी धावते. सानगडी, अर्जुनी-मोरगाव, लाखांदूर, वडसा, आरमोरी, गडचिरोली, सावली आणि मूल मार्गे ही बस चंद्रपूरकडे जाते. या मार्गावर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, कामगार तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांसाठी ही बस महत्त्वाची आहे. त्यामुळे या फेरीला नेहमीच मोठी गर्दी असते.
मात्र, सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत बस स्थानकात बस न लागल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला. चौकशी कक्षात विचारणा केली असता संबंधित वाहतूक नियंत्रक कर्मचाऱ्यांनी बसफेरी रद्द करण्यात आल्याचे सांगितले. अचानक बस रद्द झाल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. अखेर अनेक प्रवाशांना मिळेल त्या खासगी वाहनांचा अथवा अन्य वाहतुकीच्या साधनांचा आधार घेत आपापले गंतव्य गाठावे लागले.यात भर म्हणजे सकाळी ८.३० वाजताची बारव्हा-लाखांदूर-वडसा-गडचिरोली-चंद्रपूर बसफेरीही मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या बसफेऱ्यांपैकी साकोली-चंद्रपूर ही सकाळची फेरी अत्यंत महत्त्वाची ठरते. यानंतर साकोली आगारातून आरमोरी, गडचिरोली मार्गे बस नाही. अशी परिस्थिती असताना ही फेरीही ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली.
आगार व्यवस्थापकांच्या भेटीसाठीही प्रतीक्षा
बसफेरी रद्द झाल्याने संतप्त झालेल्या काही प्रवाशांनी आपली व्यथा मांडण्यासाठी आगार व्यवस्थापकांच्या कक्षाकडे धाव घेतली. मात्र, आगार व्यवस्थापक सकाळी ११ वाजल्यानंतर भेटतील, असे सांगण्यात आल्याने संतप्त प्रवाशांना उलट पायी परतावे लागले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटी बस ही दळणवळणाचे महत्वाचे साधन आहे. मात्र, महत्त्वाची बसफेरी पूर्वसूचनेशिवाय रद्द करणे आणि प्रवाशांना पर्यायी व्यवस्था अथवा माहिती न देणे, हा प्रकार एसटीच्या प्रवासी सेवेवर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. या मार्गावरील बससेवा नियमित करावी आणि फेरी रद्द करण्याची वेळ आल्यास प्रवाशांना पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.